मंदिर बनवणारा भक्तच देवाला आवडला
उद्धव पांचाळ काळाच्या पडद्याआड.
प्रा.मारोती बुद्रुक पाटील
अजून किती धक्के देणार आहेस. मन सुन्न झाले,,,,उद्धवजी पांचाळ सर…काय संयमी…शांत स्वभावी संकटात धिराने तोंड देणे…..हे सरांकडुन शिकावे….आता कोणाकडुन शिकावे….काळाने घाला घातलाच काय….काय एका मागुन एक वादळात झाडे उन्मळुन पडावी, तसे माणसं सोडुन चालली….विश्वासच बसत नाही …ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो….हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
इतरांना हिम्मत देणारा इतरांना धीर देणारा माणूस स्वतः कसा खचून जातो याच प्रत्यक्ष घडलेल उदाहरण म्हणजे उद्धव पांचाळ किती मोठ संकट आला तर त्यात काय होतं याला काय घाबरायचं असतं का अशी हिम्मत देणारा माणूस स्वतःची हिम्मत का गमावतो हेच कळेनासे झाले.
पांचाळ उद्धव हरिभाऊ(48) सर हे होकर्णा ता.जळकोट जि.लातूर येथील मूळचे रहिवाशी.ह.मु.न्यूविद्यानगर अहमदपूर येथील रहिवासी होते.ते मांडणी ता.अहमदपूर येथील जि.प.शाळेत गणिताचे विद्यार्थी प्रिय आणि अष्टपैलू व चांगले कलाकार शिक्षक होते शैक्षणिक साहित्य बनवण्यात त्यांचा हातखंडा जबरदस्त होता. साहित्य बनविण्यात त्यांना अनेकदा सन्मानित केले होते. सागवानी लाकडाची सुंदर मंदिर बनवण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नव्हते देव पाठ चौरंग कलाकुसरीने बनवत. विद्यार्थ्यांना गणिताचे शिक्षण देताना हसत खेळत शिक्षण द्यायचे परंतु स्वतःच्या मृत्यूचे गणित मात्र त्यांना सुचले नाही. एका जबरदस्त साहित्य बनवणाऱ्या गुरुजीला आम्ही पोरके झालोय.
एका महिन्यापूर्वीच मुलीचा साखरपुडा झालाय अजून मांडव सजवायचा बाकी आहे लाॅकडाऊन संपले की मुलीचे थाटामाटात लग्न करावे ही इच्छा देवाने पूर्ण करू दिली नाही. फेटा बांधून दिमाखात वावरणारा बाप उद्या तो मांडवात दिसणार नाही. काय स्वप्न पाहिले असतील त्या बापाने आणि काय स्वप्न पाहिले असेल त्या मुलींने पण या सगळ्या स्वप्नाचा चकनाचूर तू देवा काय करतोस.
मरण्याच्या दोन-तीन दिवसांपूर्वीच मुलाला चांगल्या कंपनीचा काॅल आला हे वडिलांना सांगतांना वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मृत्यूच्या सापळ्यात असलेल्या बापाला सुद्धा किती आनंद होतो हे मुलाने पाहिले. उद्धव पांचाळ सरांना सुप्रिया,अंजली, पवनदेव अशी तीन मुले आहेत आई पत्नी असा परिवार त्यांच्या पाठीमागे आहे.
पांचाळ सरांना 22 एप्रिल रोजी खाजगी रुग्णालयात लातूर येथे ऍडमिट करण्यात आले आणि 6 मे रोजी त्यांना या जगाचा निरोप घ्यावा लागला.
प्रत्येकाच्या आवडीचा प्रत्येकाच्या हृदयाचा बांध जतन करणारा मातृहृदयी प्रेमळ आणि साहित्य बनवणारा कोहिनूर हिरा आज आम्ही आता गमावून बसलोय.
22 दिवसांपूर्वी सर माझ्याकडे आले चहा घेतला घरात फर्निचर चे काम चालू असल्याने त्यांना चांगला अनुभव असल्याने त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या.
फर्निचर बनविणाऱ्या कारागिराला पांचाळ सर म्हणाले बहुत बडे प्रख्यात आदमी है उनका काम अच्छा कर के दो पांचाळ सर दररोज आमच्या सोबत फिरायला यायचे विश्वास बसत नाही की ते आपल्यात नाहीत न्यू विद्यानगर कॉलनीतील एकामागून एक असे हिरे ईश्वर आपल्याकडे घेऊन जातोय एवढी क्रूरता परमेश्वरा तू दाखवतोस आता आम्ही खूप सहन करतोय आमचा सहन करण्याचा अंतही तू पाहू नकोस अरे काय गुन्हा होता त्या माणसाचा प्रत्येकाला प्रत्येकाच्या घराला सुंदर मंदिरे बनवून देण्याचे काम केले. अरे देवा तुलाच मंदिरात बसविण्यासाठी त्यांचे प्रयत्न होते का मृत्यू लोकांची मंदिर तुला छोटी वाटली म्हणून एखाद स्वर्गात मोठ मंदिर बांधण्यासाठी त्यांना बोलवलं का तूच बसला असेल ना देवार्यात मग तुझाच भक्त तुलाच आवडला का रे पण देवा तो आमचा दोस्त होताना आज आम्ही त्यांना मिस करतोय. अगदी निरागस कुणाच्या आधी नाही कोणाच्या मधी नाही कसला कुठलाच मोह नाही प्रत्येकाला प्रेमाने हास्य वदनाने नमस्कार करणारी व्यक्ती म्हणजे पंचाळ सर.
शिक्षक हा देवापेक्षाही मोठा मानला आणि गणला गेला आहे.भारतीय परंपरेत गुरूला मानाचं आणि सन्मानाचं पूजनीय स्थान बहाल केलं आहे.शिक्षकी पेशाला पावित्र्याचा सुगंध प्राप्त झाला आहे. ज्ञानदानाचं निर्मळ आणि मंगल कार्य शिक्षकांच्या माध्यमातून होत असतं.म्हणून या पेशाकडे मोठ्या सात्विकतेने पाहिलं जातं. आपल्या समाजात शिक्षकांना मोठा आदर आहे. शिक्षकांच्या ठिकाणी ज्ञान, चारित्र्य, आणि संस्कार यांची शिदोरी कायम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात काठोकाठ भरलेली असते. आपल्याजवळ असलेल्या ज्ञानाची शिदोरी संस्कारशील स्वभावाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला तेवढ्याच तळमळीने देण्यासाठी शिक्षक रात्रंदिवस धडपडत असतो. तेच उद्धव पांचाळ सर यांनी काम केलं एवढं मोठं निर्मळ आणि प्रेमळ अंतःकरण उद्धव पांचाळ सरांचे होते.
सर संवेदनशील आणि भावनिक होते आयुष्याला नागमोडी वळणे न देता सरळ रेषेत आयुष्य प्रामाणिकपणे आणि निष्ठेने जगत जगत आपल्या पेशाला न्याय देऊन सदैव कार्यरत असणं हे त्यांचं व्यक्तिमत्व होत. सुरुवातीपासून ते आजपर्यंतच्या कार्यकाळात त्यांच्या आचारात आणि विचारात तीळमात्रही बदल झालेला नव्हता. विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे शिकवत असत त्यांचा प्रामाणिकपणाचं आणि साधेपणाचं मूल्य घेऊन जगणारे हे प्रयत्नवादी मुले आणि माणसे घडवण्याचा त्याचा हातखंडा होता आज मला आयुष्याच्या याही वळणावर सतत प्रेरणा देत होते.माझ्या जगण्याला त्यांच्या स्वभावाचं,संस्काराचा आणि ज्ञानाचा तेजस्वी तेज सतत तेजःपुंज करत असतं. त्यांच्या स्वभावाच्या जाणिवेची नाळ माझ्याशी आणि आतापर्यंतच्या हजारो विद्यार्थ्यांशी अत्यंत घनिष्ठ पणाने बांधली गेली आहे. अनेक विद्यार्थ्यांचे ऋणानुबंध हे सुंदरतेच्या रेशमी धाग्याने विणले गेले आहे. त्यांच्या स्वभावाचा सुगंध आणि ज्ञानाचे सुसंस्कार आजही आम्हाला मार्गदर्शक ठरत होते. पंचाळ सर तुमच्या जाण्याने आम्ही न्यू विद्या नगरवाशी आपल्या मार्गदर्शनाला आम्ही कायम मुकलो आहोत.
परंतु आपल्या कार्याच्या पाऊलखुणा अजूनही आमच्या सोबत असतील तुमचं भावविश्व आमच्याशी जोडले गेलेले असेल तुम्ही शरीराने नक्कीच आमच्यापासून दूर आहात पण मनाने मात्र आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत सोबत आहात आपल्या पवित्र आत्म्याला भावपूर्ण श्रद्धांजली आणि हा शब्दप्रपंच आपल्याला अर्पण करत आहोत आपला परिवार या दुःखातून लवकरच सावरावा यासाठी त्या विधात्याला प्रार्थना करत आहोत.
आम्ही सर्व न्यू विद्यानगर वाशी व तुमच्या सहवासातील आम्ही सर्व शिक्षक
शब्दप्रपंच.
प्रा.मारोती बुद्रुक पाटील अहमदपूर.