अवैध दारू विक्री करणाऱ्या आरोपी सह तीन लाख 57 हजार सहाशे रुपयांचा ऐवज जप्त
लातूर (कैलास साळूंके) : लातूर जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्गाची चैन तोडण्यासाठी कडक लॉक डाऊन चालू आहे. असे असले तरीही मद्यपींना जास्तीच्या किंमतीत विदेशी मद्य पुरवण्याची तयारी काही अवैध दारू विक्रेत्यांनी ठेवली आहे. असे असले तरीही लातूर जिल्ह्याचे पोलीस अधिकारी सतर्क असल्यामुळे अशा प्रयत्नांना वेळोवेळी कोलदांडा घातला जातो आहे. असाच एक प्रकार सात मे रोजी घडला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या आदेशानुसार त्यांच्या अखत्यारीतील विशेष पथक कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, अवैद्य धंद्याला आळा बसावा. यासाठी शहरातून फेरफटका मारत असताना अवैध धंद्याच्या संदर्भात माहिती घेताना पोहेका महेश पारडे यांच्यासोबत सपउपनि वहीद शेख, पोहेका ढगे, सोनटक्के हे पथक नवीन रेणापूर नाका लातूर येथे गस्त घालत असताना गुप्त बातमीदारा मार्फत त्यांना माहिती मिळाली की, एक पांढ-या रंगाची स्विफ्ट कार अवैद्य दारू विक्री करण्यासाठी दारू साठा घेऊन जात आहे. सदरील कार मध्ये बरीच विदेशी दारू आहे. ही माहिती हाती येताच हे पथक सावध होऊन त्या कारचा शोध घेत असताना नवीन रेणापूर नाका लातूर येथे पाळत ठेवली. संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास पांढ-या रंगाची स्विफ्ट कार एम एच 04 इ एस 62 59 ही कार आल्यानंतर त्या कारला थांबून चालकास त्याचे नाव विचारले असता बालाजी चंद्रकांत भिसे रा. सुमठाणा ता. रेनापुर, हाल मुक्काम साई रोड अग्रवाल कारखान्या जवळ लातूर असे सांगितले. त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या इसमाचे नाव रमेश माणिक चव्हाण रा. रेणुका नगर रेनापुर असे असल्याचे सांगितले. सदरील गाडीच्या संदर्भात कारची झडती घेण्याचे सांगून कारची डिकी उघडून पाहणी केली असता कार च्या आत सहा बॉक्स मिळून आले. ते उघडून पाहता त्यामध्ये विदेशी दारूच्या बाटल्या मिळून आल्याने त्यांच्याकडे त्या संदर्भात चौकशी केली असता त्यांच्याजवळ पिण्याचा व बाळगण्याचा पास परवाना नसल्याचे लक्षात आले. सदरील विदेशी दारू कोठून आणले? असे विचारले असता त्यांनी मित्र नगर येथील सौदागर वाईन शॉप लातूर येथून चोरटी विक्री करण्यासाठी खरेदी केल्याचे सांगितले.
सदरील कार मध्ये आढळून आलेल्या सहा बॉक्स प्रत्येक बॉक्समध्ये 48 विदेशी दारूच्या बाटल्या 180 एम एल च्या, काचेच्या बाटल्या त्यावर इंग्रजीत मॅकडॉल नंबर 1 असे कागदी लेबल असलेल्या सीलबंद बाटल्या एकूण 288 बाटल्या आढळुन आल्या. प्रति बॉटल दोनशे रुपये प्रमाणे 57 हजार सहाशे रुपये किमतीचा अवैध दारू साठा व चोरटी वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली पांढ-या रंगाची जुनी वापरात असलेली स्विफ्ट डिझायर कार, ज्याची किंमत तीन लाख असे एकूण तीन लाख 57 हजार सहाशे रुपयांचा ऐवज जप्त करून त्यावर पंचांच्या सह्या घेण्यात आल्या. यासंदर्भात देण्यात आलेल्या महेश नागनाथराव पारडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी बालाजी चंद्रकांत भिसे, रमेश माणिक चव्हाण आणि सौदागर वाईन शॉप चे मालक या तिघांच्या विरोधात लातूर जिल्हाधिकारी यांचे आदेश माहित असताना सुद्धा व पोलीस विभागातर्फे वेळोवेळी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करण्याचे जाहीर आवाहन केलेले असताना सुद्धा! सदरील आदेशाचे उल्लंघन करून कोणतीही काळजी, सुरक्षा न घेता संसर्ग पसरवण्याची हायगाईची कृती करून आदेशाचे उल्लंघन केले व संगणमत करून विदेशी दारूचा विक्री व्यवसाय करण्यासाठी बेकायदेशीररित्या कारमध्ये विदेशी दारूचे बॉक्स कब्जात बाळगून घेऊन जात असताना आढळून आले. या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीच्या विरुद्ध कलम 188, 269, 270 भारतीय दंड विधान संहिता व covid-19 उपाययोजना कलम 11, साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम 1897 कलम 2, 3, 4 व महाराष्ट्र दारूबंदी कायदा 65 (अ)( ई) 81, 83 प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे विशेष पथक अधिक तपास करत आहे.