लसीकरण केंद्रावर तोबा गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
औसा/लामजना (प्रशांत नेटके) : लातूर जिल्ह्यातील लामजना परिसरात तसेच आजूबाजूच्या गावात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून त्याला आवर घालण्यासाठी नागरिक कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी केंद्रावर गर्दी करत आहेत. या लसीकरण केंद्रावर नागरिकांची तुडुंब गर्दी दिसून येत असून शासनाने नेमून दिलेल्या नियमांना हरताळ फासला जात आहे. लसीकरण केंद्रावर वारंवार सूचना देऊनही काही नागरिक शिस्तीचे पालन करताना दिसत नाहीत. लस घेण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत त्यातच प्रशासनाकडून योग्य प्रकारे नियोजन व माहिती नागरिकांना दिली जात नसल्याने केंद्रांवर गर्दी होत आहे.
ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोनाचा पादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने जिल्हा प्रशासनामार्फत संपूर्ण जिल्हाभर कोरोना निर्बंध देखील लादले जात आहेत. त्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापने बंद ठेवून कडक निर्बंध लावण्यात आले असतांना देखील रुग्ण संख्या वाढत आहे. ऑक्सिजन बेड व इंजेक्शनचा वेळेत पुरवठा न झाल्याने अनेक रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत. त्याला प्रतिबंधक घालण्यासाठी नागरिक कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी गर्दी करत आहेत. लामजना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरण केंद्र असल्याने आरोग्य केंद्रावर सकाळपासून लोकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यात योग्य नियोजन नसल्याने फिजिकल डिस्टन्ससिंगचा पूर्णपणे फज्जा उडतांना दिसत आहे. दरम्यान आरोग्य विभागाकडून जनतेला फिजिकल डिस्टन्स ठेवा, मास्कचा वापर करा, कोरोना लसीकरण केंद्रावर गर्दी करू नका, शिस्त पाळा, असे आवाहन करण्यात येत आहे.