कोविड रुग्णांचे शोषण थांबवा; लुबाडणाऱ्या डॉक्टरांवर दंडात्मक कारवाईची मागणी
उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांचे मुख्य सचिवांना निवेदन
लातूर (प्रतिनिधी) : जगभराला वेठीस धरणार्या कोरोना या महामारीत डॉक्टर हे खऱ्या अर्थाने देवदूत आहेत. जवळपास सर्वच डॉक्टर रुग्णांना दुरुस्त करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.परंतु या महामारीचा फायदा घेऊन अनेक डॉक्टरांकडून रुग्ण व त्याच्या नातेवाईकांचे आर्थिक व मानसिक शोषण केले जात आहे.राज्य शासनाच्या निर्देशानंतरही लाखो रुपयांची बिले वसूल केली जात आहेत.अशी लुबाडणूक करणाऱ्या डॉक्टरांवर दंडात्मक कारवाई करावी. अनधिकृतपणे घेतलेले पैसे रुग्णांना परत करायला लावावेत अन्यथा या प्रकाराच्या विरोधात कायदेशीर लढाई लढावी लागेल,असा इशारा लातूरचे उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी राज्य शासनाच्या मुख्य सचिवांना पाठविलेल्या निवेदनात दिला आहे.
उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी आरोग्य विभागाचे सचिव,लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.,मनपा आयुक्त अमन मित्तल आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या लातूर शाखेच्या अध्यक्षांनाही यासंदर्भात निवेदन दिले आहे.
उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी म्हटले आहे की,कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने दि.३१ ऑगस्ट २०२० रोजी अधिसूचना काढून कोविड रुग्णांवर केल्या जाणाऱ्या उपचारांचे दर ठरवून दिले आहेत.या दरानुसारच उपचार करावेत अन्यथा कारवाई केली जाईल,असेही सरकारने सुचित केले आहे.परंतु या सूचनेकडे डॉक्टर मंडळी दुर्लक्ष करत आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा गैरफायदा घेऊन अवाजवी बिले आकारली जात आहेत.
अतिदक्षता विभागाच्या एका खोलीत ३ ते ४ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. प्रत्येकाकडून स्वतंत्रपणे ७ हजार ५०० रुपये प्रतिदिन याप्रमाणे शुल्क आकारले जात आहे.याच शुल्कात रक्त तपासणीही समाविष्ट असताना पॅथॉलॉजिकल चार्जेस वेगळे आकारण्यात येत आहेत.
सॅनिटायझेशन साठी एकूण बिलाच्या ५ टक्के रक्कम घेतली जात आहे.एका रुग्णाला पीपीई किट साठी जास्तीत जास्त १२०० रुपये आकारणे अपेक्षित असताना तसेच एका खोलीत जेवढे रुग्ण आहेत त्या प्रत्येकात ही रक्कम विभागली जाणे आवश्यक असताना प्रत्येक रुग्णाकडून प्रतिदिन १२०० रुपये वसूल केले जात आहेत. प्रत्येक रुग्णालयासाठी एक नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आलेला आहे.त्या अधिकाऱ्याने प्रमाणित केल्यानंतरच बिल स्वीकारणे आवश्यक आहे.परंतु त्यालाही फाटा दिला जात आहे.
कोरोनाच्या परिस्थितीत देवदूताप्रमाणे अनेक डॉक्टर्स व रुग्णालये रुग्णांचे प्राण वाचविता आहेत. परंतु काही ठराविक मंडळी या परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत.खरेतर डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी योग्य नाही पण डॉक्टरांनीही जबाबदारीचे भान ओळखणे आवश्यक आहे.त्यामुळे संबंधित डॉक्टरांनी राज्य शासन शासनाच्या अधिसूचनेप्रमाणे वैद्यकीय बिले अकरावीत. अनधिकृतपणे घेतलेले पैसे रुग्ण व नातेवाईकांना परत करावेत,अन्यथा साथरोग प्रतिबंध कायदा १९८७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व संदर्भीय अधिसूचनेचे उल्लंघन केल्यामुळे कायद्यातील तरतुदीनुसार त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी उपमहापौर बिराजदार यांनी केली आहे.
सचिवांनी संबंधित रुग्णालये व डॉक्टरांना अधिसूचनेचे कटाक्षाने पालन करण्याचे आदेश द्यावे. संबंधितावर कायदेशीर कारवाई करून रुग्णांचे आर्थिक व मानसिक शोषण थांबवावे,अन्यथा कायदेशीर लढाई लढावी लागेल,असा इशाराही उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी या निवेदनात दिला आहे.