नागरसोगा येथे तरुणांनी दिले पाडसाला जीवनदान
औसा (प्रतिनिधी) : तालुक्यातील नागरसोगा येथील तरुणांनी सोमवारी साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास नागरसोगा जवळगा रोडवर हरिणांचे नवजात पाडस कुत्र्याच्या तावडीत सापडलेले तरुणांनी पाहिले. या कुत्र्यांनी जखमी केले हे पाहून तरुणांनी या कुत्र्याचा पाठलाग करून त्या पाडसाला पकडले. त्याला पाणी पाजून त्याची जखम स्वच्छ केली, त्याला गावात आणून वन विभागाला याची माहिती दिली. काही वेळानंतर वनविभागाचे कर्मचारी गावात येऊन त्यांनी ते पाडस ताब्यात घेतले. तरुणांनी या पाडसाचा जीव वाचवला म्हणून त्याचे अभिनंदन ही केले. अजितसिंह चव्हाण, विनोद कदम, परमेश्वर कोळी यांनी नागरसोगा जवळगा रस्त्यावर हरीणाचे एक पाडस आणि त्याच्या मागे कुञे लागल्याचे पाहीले.या तरुणांनी आपल्या दुचाकी शेतात या कुञ्याच्या मागे लावल्या काही अंतर गेल्यावर कुत्र्याच्या तावडीतून त्या पाडसाला ताब्यात घेतले आणि या पाडसाला विनोद कदम यांच्या दुकानात आणून त्याच्या जखमा स्वच्छ केल्या.पाडस जखमी अवस्थेत सापडल्याची माहीती सरपंच सौ.सरोजा सूर्यवंशी यांना दिली.त्यानंतर सरपंचानी वनविभागाशी संपर्क करुन या जखमी पाडसाची माहिती दिली. त्यानंतर एक ते दिड तासात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी आधी गावात येऊन सरपंच सरोजा भास्कर सूर्यवंशी व हरीणाच्या पाडसाला वाचविणारे तरुण अजितसिंह चव्हाण विनोद कदम परमेश्वर कोळी भास्कर सूर्यवंशी बाळासाहेब कुलकर्णी यांच्याकडून ताब्यात घेतले व वनविभागाच्या औसा येथील कार्यालयात घेऊन गेले. जखमी पडसाला वाचवणारा या तरुणाची सर्वत्र कौतुक होत आहे.