राजकीय हेव्या-दाव्यात जनतेला भरडू नका- निवृत्ती सांगवे
उदगीर (प्रतिनिधी) : सध्या कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संचार बंदी, लॉकडाउन या पर्याया सोबतच मोठ्या प्रमाणात लसीकरणाचा ही प्रचार आणि प्रसार केला जातो आहे. ही आनंदाची बाब असली तरीही शासकीय पातळीवरून लसीकरणाच्या संदर्भात कसलाच ताळमेळ लागत नाही. नियोजनाचा प्रचंड अभाव जाणवत असल्याने वयोवृद्ध नागरिकांची, युवकांची मोठी हेळसांड होत आहे. राजकारणी लोक एक दुसऱ्यावर आरोप-प्रत्यारोप करण्यात मग्न आहेत. मात्र यात सर्व सामान्य जनता भरडली जाते आहे. असा आरोप राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष तथा उदगीर नगर परिषदेचे माजी नियोजन सभापती, नगरसेवक निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे) यांनी केला आहे.
सध्या उदगीरच नाही तर संपूर्ण लातूर जिल्ह्यात लसीकरणाची कमतरता जाणवत असून अनेक सेंटर बंद करण्यात आले होते, ते पूर्ववत चालू केले आहेत. मात्र 45 वर्ष वयाच्या पुढील लोकांसाठी दुसरी लस दिली जात असली तरी त्या ठिकाणी कोणतेही नियोजन नाही. नागरिकांना थांबण्यासाठी ना निवारा आहे, ना पाण्याची सोय आहे!
अनेक ठिकाणी लसीकरण करून घेण्यासाठी गेलेल्या नागरिकांना पोलिसांच्या लाठ्या काठ्या खाण्याची देखील दुर्दैवी वेळ आली आहे. उदगीर तालुक्यातील हेर येथे लसीकरण व्यवस्थित होण्यासाठी प्रशासनाला पोलीस बंदोबस्त मागवावा लागला. ही अत्यंत शोकांतिका आहे. लसीकरण करून घेण्यासाठी शासनाच्या आवाहनाला जनता प्रतिसाद देत असून, गर्दी करत आहे. मात्र ही गर्दी होण्यामागचे कारण नियोजन शून्यता हेच आहे. त्यामुळे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.
वयस्क व्यक्तींना ताटकळत थांबावे लागणे ही दुर्दैवाची बाब आहे. अठरा वर्षांपुढील युवकांना लस देणार असल्याची घोषणा करून त्यांना ऑनलाईनच्या नादाला लावले, मात्र प्रत्यक्षात ही नोंदणी करण्यासाठी बसलेल्या शेकडो युवकांना दिवसभर ताटकळत बसूनही त्यांचा नंबर येत नव्हता. लस मर्यादित आणि जनता मोठ्या प्रमाणात असे असल्यामुळे लसीकरणाची जाहिरात म्हणजे “घरात नाही दाणा आणि बाजीराव म्हणा” अशी झाली आहे. लोकांचा वेळ, श्रम वाया जात आहेत. या गोष्टीचे गांभीर्य प्रशासनाने घेऊन योग्य नियोजन करून लस उपलब्ध करून द्यावी. अशीही मागणी निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे) यांनी केली आहे. एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन वर्ष ते 18 वर्ष वयोगटातील किशोरवयीन व बालकांना लसीकरण देण्यासंदर्भात हिरवा कंदील दाखवत असतानाच 18 वर्षे ते 44 वर्षे वयोगटातील युवकांचे काय ? हा प्रश्न अनुत्तरित आहे. मोठमोठे आश्वासन आणि घोषणाबाजी करून लोकांना विद्यमान प्रश्नाकडून विचलित करण्याचे राजकारण केले जाते आहे. ही अत्यंत मोठी शोकांतिका आहे .नागरिकांचे आरोग्य जपणे हे शासनाचे कर्तव्य असून नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. मात्र या ठिकाणी राजकारण करून सर्वसामान्य जनतेला भरडण्याचे पाप सरकारकडून केले जाते आहे. हे अत्यंत निंदनीय आणि किळसवाणे आहे. असेही विचार निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे) यांनी व्यक्त केले आहे.