समाज माध्यमाद्वारे अनेकांना ब्लॅकमेल, मैत्री करताना सावधगिरी बाळगा – पोलिसांचे आवाहन
पुणे (रफिक शेख) : सध्या लॉकडाउनच्या काळात सोशल माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. फेसबूक, व्हाट्सअप वरून संवादही मोठ्या प्रमाणात साधले जात आहेत. मात्र या माध्यमांचा वापर करताना सावधगिरी बाळगा अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. असा इशारा सायबर सेलच्या वतीने देण्यात आला आहे. नुकतेच पुण्यामध्ये सायबर सेलकडे येत असलेल्या तक्रारीवरून मोठ्या प्रमाणात तरुणांना आणि व्यापाऱ्यांना अक्षरशः लुबाडले गेल्याचे प्रकरण समोर येत आहेत. सुरुवातीला तरूणींच्या आकर्षक फोटो आणि नाव वापरून बनावट प्रोफाइल च्या माध्यमातून मैत्रीसाठी फेसबुकवर आग्रह केला जातो. सुंदर सुंदर मेसेज आणि सुंदर फोटो पाहून युवकांना भुरळ पडते. सुरुवातीला सकारात्मक, सामाजिक संदेशाची देवाण-घेवाण करतच नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक मोबाईल वरून स्त्री आवाजात अत्यंत लडिवाळपणे प्रेमाचा संवाद साधला जातो. प्रेमळ बोलल्याने अनेक तरुण भाळतात. आपल्याशी बोलणारी व्यक्ती ही एखादी सुंदरी आहे असे समजून तिच्यासोबत सुरुवातीला प्रेमळ आणि नंतर अश्लील चॅटिंग केली जाते. हे करत असताना समोरचा व्यक्ती कोण? याची शहानिशा ही केली जात नाही. परिणामतः अशा प्रकरणात अडकवून तरुणांना, व्यापाऱ्यांना अश्लील फोटो पाठवून त्यांचेही नग्न फोटो मागवले जातात. उत्साहाच्या भरात अनेक तरुण आपलेही नग्न फोटो पाठवतात आणि मग हे नग्न फोटो आणि अश्लील संवादाचे चॅटिंग याची स्वतंत्र प्रोफाईल बनवून त्या तरुणांना, व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याचे प्रकार वाढलेले आहेत. या प्रकरणी राजस्थान येथून दोन भामट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या चार-पाच महिन्यांपासून शंभराहून अधिक तरुणांना अशा प्रकारातून फसवणूक झाली असावी, हे सर्व पीडित पुरुष 25 ते 55 वयोगटातील आहेत. राजस्थानमधील भामटे आपण मुलगी आहोत असे दाखवून साऊंड मॉड्यूलेटिंग सॉफ्टवेअर वापरून मुलीच्या आवाजात संवाद साधले जातात, आणि नंतर याच माहितीच्या आधारे ही सर्व प्रोफाइल समाज माध्यमावर टाकून बदनामी करण्याची धमकी दिली जाते. पैशाची मागणी केली जाते. सुरुवातीला अनेकांनी पैसे दिले. मात्र हळूहळू मागणी वाढत गेल्यामुळे हे पीडित पुणे पोलिसांच्या सायबर क्राइम ब्रांचकडे दाखल झाले. पुण्यातील तब्बल शंभराहून अधिक तक्रारी सायबर सेलच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत पथकाकडे आल्या आहेत. उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे आणि इंटरनेट प्रोटोकॉल ऍड्रेस तसेच बँक खात्याचा तपशील यावरून पोलिसांनी शोध घेतला असता, ते भामटे राजस्थान येथील असल्याचे स्पष्ट झाले. राजस्थान पोलिसांनी अशा गुन्हात दोघांना अटक केली असून याही गुन्ह्याची उकल होईल. अशी अपेक्षा पुणे पोलिसांना आहे. हे भामटे पोलिसांच्या हाती लागतील अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस. हाके यांनी दिली आहे.
गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून मराठवाड्यात गाजलेल्या पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके या प्रकरणाची निश्चित उकल करून आरोपींचा शोध लावतील. अशी खात्री पुणेकरांना आहे. मात्र चांगली मैत्री असल्याशिवाय समाज माध्यमावर संवाद साधू नये, असेही पोलिसांनी सांगितले आहे.