चिंकारा हरिणाची शिकार; दोघे शिकारी अटक 

चिंकारा हरिणाची शिकार; दोघे शिकारी अटक 

 पुणे (रफिक शेख) : वन्य जीवाचे संरक्षण व संवर्धन व्हावे यासाठी शासनाच्या वतीने विविध कायदे बनवले आहेत. त्या मुळे दुर्मिळहोत चाललेल्या अनेक वन्य जीवाच्या प्रजातीचे रक्षण होत आहे. कायद्याचे पालन व्हावे म्हणुन वन्यजीवांच्या शिकारीवर बंदी आणली आहे. असे असतांना  इंदापूर वनपरिक्षेत्रात कळस-काझड परिसरात चिंकारा जातीच्या हरणाची शिकार करून पसार झालेल्या दोघांना वनविभागाच्या पथकाने पाठलाग करून पकडले. त्यांच्याकडून बंदूक, सहा काडतुसे, दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणीआरोपी महेश जंगलू मने (वय ४०, रा. सणसर, ता. इंदापूर, जि. पुणे), दत्तात्रय पोपट पवार (वय ४२, रा. बोरी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. या दोघां आरोपीच्या विरोधात भारतीय वन अधिनियम १९२७ तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

इंदापूर वनपरिक्षेत्रातील कळस-काझड परिसरातील रस्त्यावर वन विभागाच्या पथकाकडून गस्त घालण्यात येत होती.  त्या वेळी आरोपी महेश मने आणि दत्तात्रय पवार अंधारातून निघाले होते. त्यांच्या दिशेने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी विजेरीतून प्रकाशझोत सोडला. वनविभागाचे पथक मागावर असल्याचे समजताच दोघे जण दाट झाडीत पळाले. वनविभागाच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून दोघांना पकडले. त्यांच्याकडे असलेल्या गोणीत मृत हरीण आढळुन आले. आरोपींची झडती घेतली असता यांच्याकडून नऊ बोअरची बंदूक, सहा काडतुसे, एक वापरलेले काडतूस (पुंगळी) आढळले, वनविभाने या साहित्यासह त्यांची दुचाकी जप्त केली आहे. 

पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक आशुतोष शेंडगे, वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे, अशोक नरुटे, पूजा काटे आदींनी ही कारवाई केली. या कारवाईसाठी ग्रामस्थ अतुल नरुटे, विनोद नरुटे, संदीप नरुटे यांनी सहकार्य केले. या प्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे पुढील तपास करत आहेत. वन्यजीवांची तस्करी किंवा शिकार होत असल्याची माहिती कोणास मिळाली असल्यास ग्रामस्थांनी त्वरित वनविभागाच्या जवळच्या कार्यालयास माहिती द्यावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

About The Author