लातूर जिल्ह्यात लसीकरणाचा पोरखेळ! दाखवतोय नुसता कागदी मेळ!!

लातूर जिल्ह्यात लसीकरणाचा पोरखेळ! दाखवतोय नुसता कागदी मेळ!!

लातूर (प्रतिनिधी) : कोरोना विषाणूचा संसर्ग यावर प्रभावी उपाय म्हणून लसीकरण करून घ्यावे. या प्रचार आणि प्रसाराला आता ग्रामीण भागातील लोकांनी साथ द्यायला सुरुवात केली आहे. मात्र दुर्दैवाने लोकांची मानसिकता व्हायला आणि लसीचा तुटवडा पडायला एकच गाठ पडली आहे. खुद्द आरोग्य शिक्षण मंत्र्याच्या गावात अर्थात ना. अमित देशमुख आणि आमदार धीरज देशमुख यांच्या गावात बाभळगाव येथे ग्रामीण रुग्णालयाच्या बाहेर बोर्डावर लस संपली आहे, उद्या सुट्टी आहे. असे लिहून आरोग्य विभागाने दोन आमदार असलेल्या गावच्या नागरिकांच्या प्रतिष्ठेचे धिंडवडे काढले आहेत. लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या विशेष प्रयत्नाने काही प्रमाणात लसी आल्याचे सांगितले गेले, जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात या लसी उपलब्ध करून देऊन कोणत्या केंद्रावर कोणती लस, कोणत्या वेळेत देणार? त्याचा कार्यक्रम ही जाहीर करण्यात आला. मात्र या जाहीर केलेल्या कागदी कार्यक्रमाला कोलदांडा घालुन चक्क लस संपल्यामुळे शेकडो लोकांना परत जाण्याची दुर्दैवी वेळ आली. कित्येक लोकांनी बाभळगाव येथे ग्रामीण रुग्णालयासमोर सकाळपासून दुसरा डोस घेण्यासाठी वयोवृद्धांनी एकच गर्दी केली होती. त्या सर्वांना तोंडी आज लसीकरण नाही. असे सांगण्यात आले. अशीच काहीशी अवस्था जळकोट येथे देखील जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरणाचा कार्यक्रम जाहीर करूनही त्या ठिकाणी परिसरातून आलेल्या लोकांना लस उपलब्ध नसल्याचे सांगितल्याने परत जावे लागले. गंमत म्हणजे 13 मे रोजी लस संपली आहे आणि उद्या सुट्टी आहे. असा मजकूर एका फळ्यावर लिहून ठेवला होता. बाभळगाव येथील लसीकरणला सुट्टी आहे का? असे विचारले असता, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर लक्ष्मण देशमुख यांनी लसीकरण चालू आहे, सुट्टी नाही असे सांगितले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर परगे यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही बाभळगाव येथील ग्रामीण रुग्णालयात कंपनीच्या शंभर लसीचा दुसरा डोस देण्यासाठी दिलेले आहेत, असे सांगितले. तसेच बाभळगाव येथील लसीकरण केंद्रावर सुट्टी नाही असे सांगितले. मात्र सकाळी सव्वा नऊ वाजेपर्यंत बाभळगाव येथील ग्रामीण रुग्णालयासमोर थांबलेल्या लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी किंवा त्यांना काही सूचना सांगण्यासाठी कोणीही उपस्थित नव्हते. ज्या गावातील दोन आमदार आहेत त्यापैकी एक पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत, त्या गावाची ही अवस्था असेल तर जिल्ह्यातील इतर खेड्यापाड्यात काय दुर्दशा चाललेली असेल? याचा अंदाज केलेलाच बरा! अशीही चर्चा सर्वत्र चालू आहे.

About The Author