उदगीर बाजार समिती म्हणजे लोक कल्याणकारी योजना राबवणारी संस्था- ना. संजय बनसोडे

उदगीर बाजार समिती म्हणजे लोक कल्याणकारी योजना राबवणारी संस्था- ना. संजय बनसोडे

उदगीर ( एल. पी. उगिले ) : उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांसाठी, व्यापाऱ्यांसाठी, हमाल- मापाडी यासाठी एक वरदान ठरली आहे. विविध लोक कल्याणकारी योजना प्रत्यक्ष राबवून जनतेचे हित साधणारी ही महाराष्ट्रातील अग्रणी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. असे विचार राज्यमंत्री संजयजी बनसोडे यांनी व्यक्त केले. सध्या अस्मानी आणि सुलतानी दोन्ही संकटांनी शेतकरी भरडला जातो आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे दैवत असलेल्या पशुधनाचे जर नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाले, जनावरे मृत्यू पावली, तर त्या शेतकऱ्यांना अर्थसाह्य म्हणून प्रत्येकी एकवीस हजार रुपये देण्याचा ऐतिहासिक निर्णय बाजार समितीने घेतला असून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली आहे. एखाद्या शेतकऱ्याचा कडबा जळाला असेल तर त्या शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये इतके अनुदान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने देण्यात येणार आहे. अशा योजना राबविणारी उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्रातील एकमेव बाजार समिती आहे. असेही याप्रसंगी ना. संजय बनसोडे यांनी सांगितले. ते गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे व विजा मुळे उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यक्षेत्रातील ज्या शेतकऱ्यांची जनावरे दगावली आहेत, त्यांना बाजार समितीच्या वतीने अर्थसहाय्याचे चेक देताना बोलत होते.

 उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लोक कल्याणकारी योजना लोकनेते स्व. चंद्रशेखर भोसले यांनी सुरू केल्या होत्या. मात्र त्या योजना भोसले साहेबांच्या नंतर राजकीय हेवेदावे आणि राजकारणाचा भाग म्हणून बंद कशा पाडतात येतील? या दृष्टीने विरोधकांनी पाठपुरावा करून अनेक अडथळे आणले. असे असले तरीही, लोकनेते स्व. चंद्रशेखर भोसले यांनी जी स्वप्न पाहिली होती, ती स्वप्न आपण पूर्ण करणार. असे आश्वासन याप्रसंगी उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील यांनी दिले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना वैद्यकीय सहकार्य मिळावे म्हणून शिवराज पाटील चाकूरकर आरोग्य विमा योजना बाजार समितीने सुरू केली होती, तसेच स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी आणि मुलींच्या जन्मानंतर घरात आनंद निर्माण व्हावा. यासाठी शेतकऱ्यांच्या घरी मुलगी जन्माला आल्यानंतर वैशालीताई देशमुख बालिका बचाव योजनेअंतर्गत त्या मुलीच्या नावे दहा हजार रुपये फिक्स डिपॉझिट करून मुलीच्या लग्नासाठी बाजार समितीच्या वतीने हातभार लावला जात होता. यासोबतच बाजार समिती कार्यक्षेत्रात काम करणारे हमाल, मापाडी, ड्रायव्हर यांच्या जीवितास काही धोका झाल्यास त्यांच्या परिवाराला अर्थसाह्य मिळावे यासाठी बाजार समितीच्या वतीने त्यांचा विमा उतरवला जात होता. मात्र अशा योजनांना विरोधकांनी खिळ घातल्यामुळे काही काळ या योजना प्रलंबित आहेत. मात्र या सर्व योजना, यासोबतच शेतकरी उपयोगी, शेतीच्या हिताच्या विविध योजनाही बाजार समितीच्या वतीने राबवल्या जातील. अशी ग्वाहीही पुन्हा सिद्धेश्वर पाटील यांनी दिली.

 शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य देणाऱ्या योजनेचा नळगीर आणि मादलापुर येथील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा धनादेश देऊन राज्यमंत्री ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर , काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस माजी नगराध्यक्ष, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेश्वर निटुरे ,तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण पाटील, पंचायत समितीचे सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. शिवाजीराव मुळे, बाजार समितीचे उपसभापती रामराव बिरादार, पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, बाजार समितीचे संचालक पद्माकर उगिले, संतोष बिरादार, अनिल लांजे, कुमार पाटील, गजानन बिरादार, धनाजी जाधव, गौतम पिंपरे, धनाजी मुळे यांच्यासह लाभार्थी शेतकरी व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author