पोलिसांच्या ताब्यातील मुद्देमाल पळवला? पोलिसांना तो उशिरा कळाला!!!
निलंगा (कैलास साळूंके/नाना आकडे) : सध्या निलंगा शहरात ऐकावे ते नवलच! अशी म्हणायची वेळ आली आहे. भुरट्या चोऱ्या, घरफोड्या चालु आहेतच आहेत! यासोबतच अवैध धंद्याने पाय पसरले आहेत. पोलीस प्रशासन या बाबीकडे फारसे गांभीर्याने पाहत नसावे. याचे जिवंत उदाहरण म्हणून जुन्या पोलीस स्टेशनमध्ये ठेवलेला मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. पोलिसांच्या ताब्यातील मुद्देमाल त्यांच्या नाकावर टिच्चून जर चोरटे लंपास करत असतील, तर सर्वसामान्य माणसांच्या घरादाराच्या आणि संपत्तीच्या रक्षणाची जबाबदारी कोणाची? हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या ठराविक वेळेत दारूची दुकाने उघडी आहेत. मात्र फुकटात मिळालेला हा माल हापापाचा गपापा करावा. या उद्देशाने तळीरामाने जुन्या पोलीस स्टेशनच्या खोलीत बंद करून ठेवलेला देशी दारूचा मुद्देमाल लंपास केला आहे!असे सांगितले जात आहे. वास्तविक पाहता हा मुद्देमाल लंपास झाला की केला? हाही एक प्रश्नच आहे. गेल्यावर्षी रेनापुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये लॉकडाऊन च्या काळात देशी दारूच्या मुद्देमाल म्हणून जप्त केलेल्या बाटल्या, पोलीस कर्मचाऱ्यांनी धाब्यावर विकल्याची चर्चा लोकांना माहिती आहे. तसाच एखादा प्रकार येथे तर घडला नाही ना? असाही प्रश्न निर्माण होतो आहे. पोलिसांच्या ताब्यातील मुद्देमाल गहाळ झाला तर ज्या गुन्ह्यातील तो मुद्देमाल आहे, त्या गुन्ह्याचे पुढे काय? एखाद्या गुन्हेगाराला सूट देण्यासाठी तर असा प्रकार झाल्याचा कांगावा केला जात नसावा ना? असाही प्रश्न निर्माण होतो आहे.
निलंगा येथे पोलिस स्टेशनची जुनी जागा अपुरी पडत असल्याने पोलीस स्टेशनची नवीन इमारत (टोलेजंग !)उभा करण्यात आली आहे. असे असतांना पोलिसांनी मुद्देमाल जुन्या इमारतीत का ठेवला? हा ही प्रश्न लोकांना पडला आहे. जुन्या पोलीस स्टेशन मध्ये विविध गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या देशी दारूच्या 48 बाटल्या, ज्याची अंदाजे किंमत अडीच हजार रुपये होते. ती दारू पळवण्याची ही घटना आहे! सदरील घटना दिनांक 16 मे 2021 रोजी पोलिसांच्या निदर्शनास आली! आणि पोलिसांचे धाबे दणाणले. पोलीस स्टेशन मधून मुद्देमाल चोरीस जातो, म्हटल्यानंतर वरिष्ठांकडून कानउघाडणी होणारच! यामुळे पोलिसांना दिलेल्या विशेषाधिकाराचा उपयोग करत या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी की काय? संशयित आरोपी म्हणून निलंगा पोलिसांनी अकबर उर्फ टायगर फतेह अहमद शेख यास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध निलंगा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवला आहे. सदरील प्रकरणी 454, 457, 380 भारतीय दंड विधान संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास निलंगा पोलीस करत आहेत.
आता त्या संशयित आरोपीकडून साम, दाम, दंड, भेद वापरून जप्त दाखवला जाणारा मुद्देमाल त्या गुन्ह्यातीलच आहे का? कि त्या जुन्या गुन्ह्यावर पडदा टाकण्यासाठी नवीन माल दाखवला जाणार? हाही संशोधनाचा विषय ठरणार आहे! महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, प्रशासनाच्या वतीने नवीन इमारत इतकी चांगली बांधलेली असतांना मुद्देमाल जुन्या इमारतीत ठेवलाच कसा? त्याच्यावर कोणाची देखरेख होती? याही गोष्टींचा तपास होणे महत्वाचे आहे. कारण त्या अनुषंगाने शहरात चर्चेला उधाण आले आहे.इतर कोणता मुद्येमाल अजुनही त्या जुन्या इमारतीत ठेवला गेला नाही ना? याचीही शहानिशा करणे गरजेचे आहे.