खाकी वर्दीतील माणुसकी जपणारे वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी संजय बेरळीकर
औसा (प्रशांत नेटके) : वाहतूक शाखेचे कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी संजय बेरळीकर यांनी आपल्या आजवरच्या सेवेत आपली कर्तव्ये जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे व निष्ठेने पार पाडली आहे. वाहतूक शाखेत मागील तीन वर्षांपासून ते कार्यरत आहेत. कोरोनाकाळात सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी वाटसरूंना सर्वोतोपरी मदत केली. महामार्गावरील खड्डे बुजविणे, वाहतूक नियम व वाढते अपघात रोखनेच्या कामी जनसामान्यांत पोलिसांबद्दल आपुलकी राहावी व वाहतूक जनजागृती निर्माण व्हावी यासाठी ते अविरतपणे कार्यरत आहेत. अपघातग्रस्तांचा जिव वाचविणे कामी तत्परतेने अपघातग्रस्तांना मदत करण्यात त्यांचा हातखंडा आहे. एकूणच आजवर केलेल्या उल्लेखनीय कामगिरी करून सर्वसामान्यांना आपलेसे केले आहे.
औसा लातुर मार्गावरील औसा टी पॉईंट ला एका हातात शिट्टी अन दुसऱ्या हातात काठी घेऊन क्षणात रस्त्यावरील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करणारे कर्मचारी म्हणून संजय बेरळीकर यांची ओळख आहे.
औसा शहरातील वाहतुकीच्या समस्या सोडवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे वाहतूक पोलीस कर्मचारी म्हणून संजय बेरळीकर यांचे नाव घेतले जाते. औशातील नागरिकांना वाहतुकीच्या बाबतीत शिस्त लावणे आणि सर्वसामान्य नागरिकांना शिस्तीचे पालन करण्यासाठी संजय बेरळीकर यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. संजय बेरळीकर यांनी औसा शहरात वाहतूक कोंडी असो की अवैध वाहतूक या सर्वांवर आपल्या अनोख्या शैलीतील कलागुणांच्या आधारे चाप बसवला आहे.