अवास्तव रासायनिक खत दरवाढ रद्द करा, अन्यथा मोर्चा काढणार – डॉ नरसिंह भिकाणे
अहमदपूर (गोविंद काळे) : रासायनिक खतांच्या किमतीत कमालीची वाढ झाली असून, खत कंपन्यांकडून दरवाढ होणार नाही, असे सांगूनही भाववाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे तरी खतांची झालेली दरवाढ मागे घेऊन जुन्या दारातच खते देण्यात यावी अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.कोरोना काळात आधीच शेतकऱ्यांच्या मालास भाव मिळत नसल्याने आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात रासायनिक खतांच्या भाववाढीमुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.गेल्या खरीप हंगामात पाऊस चांगला होऊनही उत्पन्नात घट आल्याने जेमतेम उत्पन्नावरच शेतकऱ्यांना उदरनिर्वाह करावा लागला. त्यात शेती उत्पादनात आलेल्या मालाला भाव मिळाला नाही.खरीप हंगामासाठी लागणारे बी-बियाणे व खतांच्या खरेदीसाठी शेतकरी कर्जावर अवलंबून असतो. गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचे सावट असल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना पीककर्जासाठी खासगी बँका, पीक सोसायट्या यांचे कर्ज परत फेडने ही कठीण झाले आहे.या खरीप हंगामात केंद्र सरकारकडून रासायनिक खतांची भाववाढ होईल की नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था दिसून येत होती ती दूर करण्यासाठी या वर्षी खतांच्या किंमतीत वाढ होणार नाही असे केमिकल व फर्टिलायझर्सचे केंद्रीय मंत्री मनसुख मंडविया यांनी सर्व खत कंपन्यांच्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती दिली व त्याबाबत माहितीचा व्हिडिओ व्हायरल केला. त्यामुळे खतांच्या किमतीत वाढ होणार नाही, हे निश्चित झाल्यानंतरही गेल्या दोन दिवसांपासून सर्व खत कंपन्यांकडून मोठी भाववाढ करून दरपत्रक जाहीर झाले आहे.तरी खतांची झालेली भाववाढ मागे घेऊन जुन्या दरातच खते देण्यात यावीत असे डॉ नरसिंह भिकाणे म्हणाले.या आठवड्यात ही भाववाढ कमी नाही झाली तर लॉकडाऊन नंतर जिल्हाधिकारी कर्यालावर शेतकरी मोर्चा काढू असा इशाराही शेवटी त्यांनी दिला आहे.