पोलिसांच्या अर्थपूर्ण संबंधाचे धिंडवडे काढणाऱ्या पत्रकारास गर्भित धमकी?

पोलिसांच्या अर्थपूर्ण संबंधाचे धिंडवडे काढणाऱ्या पत्रकारास गर्भित धमकी?

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील निलंगा विधानसभा मतदारसंघ सध्या अवैद्य धंद्याचे माहेरघर म्हणून ओळखले जाते आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाने युवकांच्या, तरुणांच्या आणि नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून गुटखा, सुगंधित तंबाखू निर्मिती, वाहतूक आणि विक्रीला बंदी घातली आहे. यामुळे शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल गमवावा लागतो आहे. असे असले तरीही महाराष्ट्रामध्ये पूर्णतः गुटखा, सुगंधित तंबाखू विक्री आणि वाहतुकीला आळा बसलेला नाही.

 महाराष्ट्र, आंध्र आणि कर्नाटकाच्या सीमावर्ती भागात असलेल्या निलंगा विधानसभा मतदारसंघातील दोन-तीन पोलीस स्टेशनच्या कक्षा ओलांडून हा गुटखा, सुगंधी तंबाखू बिनदिक्कतपणे महाराष्ट्रात येत आहे! एक वेळ अनावधानाने एका ट्रकचा अपघात झाला आणि त्या ट्रक मध्ये भरलेला लाखो रुपयांचा (महाराष्ट्र शासनाने बंदी घातलला) गुटका पोलिसांना आढळून आला! कर्नाटकातून औराद शहाजानी मार्गे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ही अवैध वाहतूक होत असताना देखील पोलीस काय करतात? हा गंभीर प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. एक वेळ तर एका संपादकाने एका पत्रकाराला मे महिन्याच्या पूर्वसंध्येला कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या गुटख्याच्या ट्रकची माहिती दिली. त्या पत्रकाराने या अनुषंगाने औराद शहाजानी आणि निलंगा पोलिसात सूचना दिली.

 निलंगा पोलिसांनी पत्रकारांनी दिलेल्या माहितीची खातरजमा करून आंध्र प्रदेश, कर्नाटकातून महाराष्ट्रात येत असलेला ट्रक के ए 38 -64 82 हा निलंगा येथील उदगीर मोड रस्त्यावर सापळा रचून पकडला. त्यामध्ये पत्रकाराने दिलेल्या माहितीप्रमाणे अवैध गुटखा आढळून आला!

 त्यानंतर संबंधित गाडीवर कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन त्याची शहानिशा केली आणि संबंधितावर गुन्हा दाखल केला. असे असले तरीही सदरील अवैद्य वाहतूक खुलेआम औराद मार्गे महाराष्ट्रात येत असताना औराद शहाजानी पोलीस स्टेशनचे अधिकारी-कर्मचारी काय करतात? हा प्रश्न जनता विचारत असतानाच पोलिसांच्या अर्थपूर्ण संबंधाची ही चर्चा जनतेमध्ये सुरू आहे. लातूर जिल्ह्याचे सुपुत्र, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांना पुरस्कार मिळाल्यानंतर निलंगा येथील चळवळ कट्ट्याचे प्रमुख ओबीसी नेते दयानंद आन्ना चोपणे, आरपीआय (डे) महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विलासराव सूर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष इस्माईल लदाफ, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष डॉक्टर हंसराज भोसले, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक रोहित बनसोडे, साप्ताहिक निलंगा माझाचे संपादक असलम झरेकर या सर्वांनी निसार तांबोळी यांच्या सत्काराचे नियोजन केले होते.

 यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, निलंगा आणि औराद शहाजानी येथील अवैध धंदे आणि गुन्हेगारी जोपर्यंत मुळातून संपत नाही. तोपर्यंत मला समाधान व्यक्त करता येणार नाही. याचा अर्थ औराद शहाजानी येथे चालणाऱ्या अवैध धंद्याची सर्व कल्पना वरिष्ठ अधिकाऱ्यांना आहे. असे असतानाही त्याठिकाणी कर्तबगार पोलीस अधिकारी का दिला जात नसावा? हाही प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. जिल्हा पोलीस प्रमुख यांनी या अवैध धंद्या बद्दल स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली होती. त्याच वेळी मी ही नाराजी भरून काढेल आणि त्यावेळी तुम्ही खरं कौतुक करावं. अशीही सूचना केली होती, तसेच पत्रकारांना काही माहिती असेल तर त्यांनी बिनधास्त सांगावं असे म्हणून त्यांनी स्वतःचा नंबर ही दिला होता. या विश्वासावरूनच त्या पत्रकाराने अवैध गुटख्याची गाडी येणार असल्याची कल्पना स्थानिक पोलिसांना दिली.

 मात्र त्याचे भलतेच परिणाम झाले. निलंगा पोलीसांनी कर्तबगारी दाखवली खरी, मात्र काही पोलिस कर्मचाऱ्यांनी सदरील संपादकाला कोणत्यातरी गुन्ह्यात अडकवून त्याच्या पाठीवर काठी चालविणारच अशा पद्धतीची गर्भित धमकी दिल्याच्या संदर्भात संबंधित पत्रकारांनी समाज माध्यमावर माहिती कळवली आहे. सदरील ट्रक ची माहिती  वरिष्ठांना व पत्रकारांना जो संपादक देतो त्याच्यामुळे माझी नाचक्की झाली आणि झाकून असलेले सर्व  उघडकीस आले! त्यामुळे मी जोपर्यंत इथे आहे, तोपर्यंत या कोरोणाच्या नियमात अथवा चांगल्या गुन्ह्यात गुंतवून त्याच्या पाठीवर मी काठ्या घालणारच! अशी सरळ-सरळ धमकी त्या कर्मचाऱ्याने संपादकाला दिली आहे. या अनुषंगाने त्या पत्रकाराने ही माहिती सर्व पत्रकारांना व संबंधित लोकप्रतिनिधीनाही दिलेली आहे. या संदर्भातले आवश्यक पुरावेही त्यांनी गोळा करून ठेवले आहेत.

 समाजामध्ये मी किती आदर्श आहे? मी किती चांगलं काम करतो. हे दाखवण्याची एक फॅशन सुरू झाली आहे.अनेक पुढारपण करणारे स्वतः गुटखा, सुगंधी तंबाखू विक्री आणि वाहतुकीला पाठिंबा द्यायचा आणि त्यातून मिळालेले चार पैसे या पदार्थाच्या वापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामाची दुरुस्ती करण्यासाठी दवाखान्याला दान द्यायचे! आणि स्वतःची पाठ थोपटून घ्यायची. असे प्रकार सर्रास समाजात घडत आहेत. बिचारे सर्वसामान्य नागरिक (इतिहास विसरून) दानशूर व्यक्तीचे टाळ्या वाजवून कौतुक करत असतात! मात्र हे दान करण्यासाठी आलेला पैसा कुठला आहे? हे मात्र सर्वसामान्य नागरिकांना कळाले पाहिजे. आणि राजरोसपणे चालू असलेले अवैध धंदे बंद झाले पाहिजेत.

 मिस्टर क्लीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा पोलिस अधीक्षकांनी किमान अशा संवेदनशील पोलीस स्टेशन च्या ठिकाणी कर्तबगार पोलीस अधिकारी द्यावेत. अशी रास्त मागणी जनतेमधून होत आहे, तसेच कोणत्याही पत्रकारावर आकसापोटी पोलिसांनी गुन्हे दाखल केले तर त्याची पूर्ण शहानिशा झाल्याशिवाय संबंधित पत्रकारांना त्रास दिला जाऊ नये. अशीही भावना जनमानसातून निर्माण होत आहे.

About The Author