लॉकडाउन काळात सर्वसामान्यांना आर्थिक मदत करा – बहुजन अभीयानचा बोंबल्या मोर्चाचे नियोजन

लॉकडाउन काळात सर्वसामान्यांना आर्थिक मदत करा - बहुजन अभीयानचा बोंबल्या मोर्चाचे नियोजन

उदगीर (प्रतिनिधी) : कोरोना विषाणूचा संसर्ग च्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात लाॅक डाऊन सुरू आहे.त्यामुळे शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, फळविक्रेते, भाजीविक्रेते, किरकोळ दुकानदार, वंचित व असंघटित निराधार, हातावर पोट असणारे कामगार, रस्त्यावर भंगार जमा करून आपली उपजीविका भागवणारे मजूर, 12 बलुतेदार, या लाॅक डॉऊन मुळे बंद पडलेले उद्योग धंदे, गेलेल्या नोकऱ्या यामुळे उद्विग्न झालेल्या सर्वसामान्य माणसांना जगणे कठीण झाले आहे. त्यांना उपजीविका भागवण्यासाठी प्रत्येकी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत शासनाने त्वरित करावी. तसेच कोविडच्या सर्व रुग्णांना मोफत ऑक्सिजन, अंॅबुलन्स सेवा, रेमेडी सिविर इंजेक्शन यासोबतच आवश्यक ती सर्व इंजेक्शने व औषधे उपलब्ध करून दिली जावी.

 गेल्यावर्षी याच काळात वाढीव वीज बिले आलेली आहेत, त्याचीच पुनरावृत्ती आत्ताही चालू आहे. एका बाजूला कोरोनामुळे मृत्यु दर वाढत आहे. उपासमारीमुळे लोक मरत आहेत. या सर्व गोष्टीचे गांभीर्य विचारात घेऊन शासनाने वीज बिल माफ करावे. गोरगरिबांना फक्त तांदूळ आणि गहू मोफत दिल्याने सर्व समस्या सुटणार नाहीत. याची दखल घ्यावी.

 अनेक शेतकऱ्यांना आजही खरिपाचा विमा देण्यात आलेला नाही. सर्व शेतकऱ्यांना पीक विमा त्वरित देण्यात यावा. अनेक विभागाच्या कर्मचाऱ्यांना लॉक डाउन मुळे नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत, त्यांचे जगणे कठीण झाले आहे. याही गोष्टीची शासनाने दखल घेऊन त्यांना जगण्यासाठी अर्थसाह्य करावे. सर्वसामान्यावर खर्च करण्यासाठी आवश्यक असणारे पैसे कोरोनाच्या निधी मध्ये जमा करण्यात यावे. अशा विविध मागण्यांचे निवेदन बहुजन विकास अभियान च्या वतीने उपजिल्हा अधिकारी यांच्यामार्फत शासनाला देण्यात आले आहे,या निवेदनाचा सहानुभुतीपुर्वक विचार नाही झाल्यास बहुजन विकास अभियानच्या वतीने बोंबल्या मोर्चा काढण्यात येईल,असा इशारा  सदरील निवेदनात दिला आहे.या निवेदनावर बहुजन विकास अभियानचे प्रणेते अभियान प्रमुख संजय कुमार, सल्लागार विधिज्ञ एम. चव्हाण, लोकनेते बापूसाहेब कांबळे, राजहंस लोणीकर इत्यादी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

About The Author