उपविभागीय पोलिस अधिकारी जगदाळे आणि त्यांच्या पथकाची धडाकेबाज मोहीम
लातूर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्ह्यात चोऱ्या, घरफोड्या करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश लातूर पोलिसांनी केला आहे. लातूर शहराचे उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जगदाळे हे आपल्या सहकाऱ्यांसह रात्रपाळीच्या गस्तीवर असताना चोरी करण्याच्या तयारीत असलेले तिघे आणि फरार झालेले दोघे अशा पाच जणांना मोठ्या शिताफीने अटक केली आहे.
यासंदर्भात हाती आलेली माहिती अशी की, उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांना गुप्त माहितीदारा मार्फत बातमी समजली की, सिद्धेश्वर मंदिर परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत काही इसम आहेत. ही माहिती हाती लागताच उपविभागीय पोलिस अधिकारी जगदाळे यांनी त्यांच्या विशेष पथकातील सहाय्यक फौजदार वाहिद शेख, पोलीस हेड कॉन्स्टेबल आर बी ढगे, पारडे आणि गांधी चौक पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कव्हाळे, पो ना शिंदे, बेसके यांना सोबत घेऊन सिद्धेश्वर मंदिराचे उत्तर कंपाऊंड कडे गेले असता त्या ठिकाणी दरोडा टाकण्याच्या तयारीत अंधारात बसलेले काही लोक लक्षात आले. पोलिसांची चाहूल लागताच त्यापैकी दोघांनी कंपाउंड वरून उड्या मारून अंधाराचा फायदा घेत पळ काढला.
दरम्यान या पथकाने तिघांना ताब्यात घेतले. त्यांचे नाव विचारले असता अजिंक्य नीळकंठ मुळे (24 वर्ष रा. उत्का ता. औसा ह.मु. जुना औसा रोड लातूर) विश्वजीत अभिमन्यु देवकते (वीस वर्ष रा. कातपुर ता. जि. लातूर) गणेश महादेव माने (19 वर्ष रा. खोरी गल्ली लातूर) असल्याचे आढळून आले. त्यांची अंगझडती घेतली असता, विश्वजीत देवकते यांच्याकडे एक लोखंडी रॉड, अजिंक्य मुळे यांच्याकडे तलवार, गणेश माने याच्याकडे खिशात मिरचीची पावडर मिळून आले. पळून गेलेल्या इसमाचे नाव विचारले असता सुनील विठ्ठल भोसले आणि निलेश काळे असल्याचे स्पष्ट झाले. पोलीस उपविभागीय अधिकारी जितेंद्र जगदाळे यांच्या फिर्यादीवरून गांधी चौक पोलीस स्टेशन येथे गुरनं 299/ 21 कलम 399, 402 ,188, 269, 270 भा. द. वि. व कलम 4, 25 भारतीय हत्यार कायदा तसेच covid-19 प्रतिबंधक अधिनियम 2,3,4 प्रमाणे वरील पाचही आरोपीतांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील पाचही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरोधात जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशन अंतर्गत माला विषयीचे आणि शरीर विषयीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलीस रेकॉर्डमध्ये नोंद आहे.
दुसऱ्या दिवशी उपविभागीय पोलिस अधिकारी जगदाळे यांच्या आदेशावरून विशेष पथकातील वाहेद शेख, रामचंद्र ढगे, महेश पारडे गांधी चौक पोलिस स्टेशनचे दत्ता शिंदे, बेस्के यांनी सदरील गुन्ह्याच्या संदर्भात फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेतली असता, सुनील विठ्ठल भोसले हा मोटरसायकल सह आढळुन आला. सदरील मोटारसायकलच्या संदर्भात विचारणा केली असता सिद्धेश्वर मंदिर परिसरातून पळ काढल्यानंतर रात्री मजगे नगर परिसरातील एका घरासमोर मोटार सायकल थांबलेली दिसून आली, ती मोटरसायकल लंपास केली. ही तीच मोटरसायकल असल्याचेही त्याने सांगितले. यासंदर्भात अधिक तपास केला असता गांधी चौक पोलीस स्टेशन येथे गुरन 302 /21 कलम 379 भादवी मधील चोरीची मोटारसायकल असल्याचे निष्पन्न झाले.
सदरील मोटारसायकलल जप्त करण्यात आली. सदरील आरोपीने यापुर्वीही ट्युशन भाग, दयानंद कॉलेज गेट, प्रकाश नगर या भागातील दुकानांचे शटर कुलूप तोडून आत प्रवेश करून त्यातील रोख रक्कम व मोबाईल चोरी केल्याचे व इतर बरेच मोबाईल चोरी केल्याचे सांगितले आहे. सदर मोबाईलचा तपास ह्या विशेष पथकामार्फत चालू आहे.
ही कारवाई या विशेष पथकाने लातूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केली. पोलिसांच्या उत्कृष्ट तपासा बद्दल जनतेमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.