एलसीबी च्या पथकाकडून उत्कृष्ट कामगीरी !! अट्टल घरफोड्यांना जेलची वारी !!!
लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील चोऱ्या आणि घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोरांना लातूर स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या पथकाने अत्यंत शिताफीने अटक केली आहे. लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला पोलीस अधिकारी म्हणून गजानन भातलवंडे रुजू झाल्यापासून एकानंतर एक धडाकेबाज कामगिरी करून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे नावलौकिक वाढवत आहेत. लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वाखालील पथक यामध्ये प्रामुख्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक बहुरे, संजय भोसले, पोलीस हवालदार राजेंद्र टेकाळे, योगेश गायकवाड, प्रकाश भोसले, हरून लोहार, रामहरी भोसले, प्रदीप चोपणे ,नागनाथ जांभळे यांच्या पथकाने विशेष कामगिरी केली आहे. लातूर जिल्ह्यातील विविध गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास पथकांच्या माध्यमातून तपास करण्याचा प्रयत्न चालू केले असता, दिनांक 27 मे रोजी या विशेष पथकाला गोपनीय माहितीदाराच्या आधारावर संशयित आरोपी कृष्णा श्रावण शिंदे रा. सुंबा जि. उस्मानाबाद याची माहिती मिळाली.
सदरील माहितीची खातरजमा करून या विशेष पथकाने विविध गुन्ह्याच्या अनुषंगाने कृष्णा शिंदे त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, आरोपीने घरफोडीचे अनेक गुन्हे केल्याचे कबूल केले आहे. त्याने घरफोडीत चोरीस गेलेला मुद्देमाल एक मोटारसायकल, सोन्याचे दागिने, 6 मोबाईल असा एकूण दोन लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या आरोपीने आणि त्याच्या इतर साथीदारांसह मुरुड, किल्लारी, भादा आणि लातूर एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत केलेली आणखी चार गुन्हेही कबूल केले आहेत. याउपरही अनेक घरफोड्या आणि चोर्या या आरोपीकडून आणि त्याचे साथीदारा कडुन उघड होऊ शकतील. अशी अपेक्षा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला वाटत आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या सर्व पथकाचे कौतुक जनतेमधून केले जात आहे. अशीच धडाकेबाज मोहीम त्यांनी चालू ठेवल्यास पोलिस प्रशासनाच्या प्रतिमेस निश्चित उजाळा मिळेल! असेही बोलले जात आहे.