तगरखेडा-औराद तेरणा नदीवरील पुलाचे रखडलेले काम तात्काळ सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी साहेबांना दिले निवेदन
निलंगा (भगवान जाधव) : तालुक्यातील तगरखेडा औराद तेरणा नदीवरील पुलाचे रखडलेले काम तात्काळ सुरू होण्यासाठी भूसंपादन प्रस्ताव मंजूर करण्याबाबत जिल्हाधिकारी साहेबांना काँग्रेसचे युवा नेते तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अभय साळुंके यांच्या नेतृत्वाखाली तगरखेडा गावचे सरपंच, उपसरपंच यांनी निवेदन दिले.
निवेदनात सांगितले की, तेरणा नदी वरील तगरखेडा औराद (शहा) उच्चस्तरीय पुलाचे काम गेल्या सात वर्षापासून अर्धवट अवस्थेत रखडलेले आहे.त्यामुळे औराद (शहा), तगरखेडा हालसी,तांबरवाडी तसेच कर्नाटकातील तुगावसह काही गावे व देवणी तालुक्यातील वलांडी व औराद ही दोन्ही बाजारपेठा जोडणारा हा पूल अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
त्याचे काम रखडल्यामुळे या संबंध परिसरातील जनतेची प्रचंड गैरसोय होत आहे.युती सरकारच्या गेल्या पाच वर्षात व आता कोविड-19 च्या दिड दोन वर्षाच्या कालावधीत केवळ 2952 चौरस मीटर जागेच्या भूसंपादन अभावी हे काम रखडले आहे.
लातूर चे पालकमंत्री मा. ना. अमित विलासराव देशमुख त्यांच्या आदेशाने उर्वरित पूलाचे बांधकाम व भूसंपादनासाठी साधारण 90 लाख रुपये गेल्या सहा महिन्यापूर्वीच मंजूर केले आहेत. केवळ भूसंपादनाच्या तांत्रिक विषय व कोविड-19 यामुळे रखडलेला आहे. हे काम तात्काळ मार्गी लावून परिसरातील जनतेला न्याय द्यावा ही विनंती निवेदनात करण्यात आली. काँग्रेस युवा नेते तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अभय साळुंके ,तगरखेडा गावचे सरपंच केवळाबाई सूर्यवंशी, उपसरपंच मदन बिरादार यांच्या स्वाक्षरीसह हे निवेदन जिल्ह्याधिकारी साहेबांना देण्यात आले.यावेळी काँग्रेस युवा नेते अभय साळुंके, उपसरपंच मदन बिरादार, रणजित सुर्यवंशी उपस्थित होते.