दयानंद कला येथे संशोधन विभागाच्या वतीने प्री – पीएच. डी. कोर्सवर्कचे ऑनलाईन उद्घाटन संपन्न
लातूर (प्रतिनिधी) : दि.२९ मे रोजी दयानंद कला महाविद्यालयांतर्गत संशोधन विभागाच्यावतीने प्री – पीएच.डी. कोर्सवर्क (उन्हाळी) २०२१ उद्घाटन सत्र ऑनलाईन पध्दतीने आयोजित केले होते.
प्रस्तुत उद्घाटन सत्रात अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, संशोधन विभागाच्या संचालिका डॉ. सुनीता सांगोले, सहसंचालक प्रा. विवेक झाम्पले, साधन व्यक्ती डॉ. रेणुका लोंढे (राजर्षी शाहू महाविद्यालय,लातूर) आणि कोर्सवर्कसाठी प्रवेशित संशोधक यांची उपस्थिती होती.
संशोधन हे केवळ विज्ञानाच्या क्षेत्रात होते; ते केवळ शोध स्वरूपातच असते असे नव्हे तर संशोधन साहित्य, भाषा, कला, सामाजिकशास्त्रे अशा सर्वच क्षेत्रांमधून होत असते. साहित्य किंवा भाषेतील संशोधनाने समाजाच्या प्रगतीस मोठाच हातभार लावला आहे. असे मनोगत प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड यांनी व्यक्त केले. संशोधकांना मार्गदर्शन करताना ते असे म्हणाले कि, साहित्य किंवा भाषेद्वारे होणारे संशोधन समाजात उपयुक्त ठरावे म्हणून संशोधकाने संशोधनासाठी घेतलेली मेहनत महत्त्वाची असते. विषय निवडीपासून ते संशोधन पूर्णत्वाला जाईपर्यंतचा प्रवास करण्यासाठी प्रस्तुत कोर्सवर्क त्यांना निश्चितच मार्गदर्शक ठरेल. या कोर्सवर्कच्या आयोजनासाठी संशोधन विभागाच्या संचालिका डॉ. सुनीता सांगोले, सहसंचालक प्रा. विवेक झाम्पले यांनी मेहनत घेतली आहे आणि मला खात्री आहे हे कोर्सवर्क फलद्रूप होईल अशा पद्धतीने ते घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी 'संशोधन ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे.' माणसाच्या जिज्ञासेतुन माणूस संशोधनाकडे वळला आणि संशोधनाचा परिणाम म्हणजे भौतिक,अभौतिक सगळ्याच घटकांमध्ये माणसाने केलेली प्रगती होय. संशोधन मूलभूत स्वरूपाचे, मानवी विकासास हातभार लावणारे, समाजोपयोगी असावे असे मत व्यक्त करुन डॉ. सुनीता सांगोले यांनी कोर्सवर्कचे स्वरूप व रुपरेषा स्पष्ट केली. हे कोर्सवर्क संशोधक विद्यार्थ्यांना संशोधनास सहाय्य करणारे मार्गदर्शक ठरेल असा विश्वास व्यक्त केला.
प्री – पीएच. डी. कोर्सवर्क २०२१ ला प्रवेशित संशोधक, मार्गदर्शक या सर्वांच्या उपस्थितीत ऑनलाईन पध्दतीने घेतलेले प्री – पीएच. डी. कोर्सवर्कचे उद् घाटन संपन्न झाले.