दुसरे लग्न करून महिलेची फसवणूक, ब्लॅकमेल करून त्रास – गुन्हा दाखल
पुणे (रफिक शेख) : पुणे जिल्ह्यातील एका खाजगी कंपनीत चांगल्या पदावर असलेल्या व्यक्तीने एका महिलेला आपण अविवाहित असल्याचे सांगून दुसरे लग्न केले. तिच्याकडून बावीस तोळे सोने लंपास करून आणखी पंचवीस लाख रुपयांची खंडणी मागत असल्याची दुर्दैवी घटना वारजे माळवाडी पोलीस ठाणे अंतर्गत घडली आहे. यासंदर्भात तक्रारदार महिलेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून एका खाजगी कंपनीत चांगल्या पदावर असलेला भारत बाजीराव पवार (वय 39 वर्षे )त्याच्यावर वारजे माळवाडी पोलिस ठाणे अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भारतीय दंडविधान संहितेच्या कलम 377, 379, 384, 493, 406, 417, 323, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात तक्रारदार महिलेने स्पष्ट केले आहे की, जुलै 2020 ते 2021 या कालावधीत हा प्रकार घडला आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी पीडित महिला ही शासकीय नोकरदार आहे. आरोपी सांगली येथील असून तो पण पुण्यातील खासगी कंपनीत चांगल्या पदावर नोकरीला आहे. त्याचा विवाह झाला असतानांही आणि एक मुलगी असतानांही त्याने पैशाची हाव ठेवत ही माहिती लपवून विवाह संकेतस्थळावर नोंदणी केली होती. पीडित महिला आणि या व्यक्तीची ओळख या संकेत स्थळावर झाली, नंतर त्यांनी समाज माध्यमावर संवाद साधून मैत्री वाढवली. त्यानंतर फिर्यादी बरोबर आरोपींनी लग्न केले. फिर्यादीकडे असलेले बावीस तोळे सोने सध्याच्या काळात घरात ठेवणे योग्य नाही म्हणून काढून घेतले. तसेच फिर्यादी सोबत अश्लील आणि अनैसर्गिक पद्धतीने लैंगिक अत्याचार,संभोग करून त्याचे चित्रीकरण केले. सदरील फोटो आणि चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देत, तिच्या कडून 25 लाख रुपयांची मागणी केली. यापूर्वी दिलेल्या 22 तोळे सोन्याच्या संदर्भात विचारपूस केली तर पीडित महिलेला आरोपी मारहाण करायचा. दोघात वाद व्हायचे. दरम्यान पीडित महिलेला आरोपी हा विवाहित असून त्याला एक मुलगी असल्याचेही समजले.
याप्रकरणी आपली मोठी फसवणूक झाली असून आपण लुबाडले जात असल्याचे लक्षात येताच, या तीस वर्षीय सरकारी नोकरी असलेल्या महिलेने आरोपी भारत बाजीराव पवार याच्याविरुद्ध रीतसर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक कथले या अधिक तपास करत आहेत. समाज माध्यमावर संबंध प्रस्थापित करून लूट करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरु असून जनतेने यासंदर्भात शहानिशा केल्याशिवाय व्यवहार करू नयेत. असे पोलिसांकडून वारंवार सांगण्यात येत आहे.