उदगीर शहरात भाईगिरीचे लोन, भर दुपारी जबरी चोरी
उदगीर (प्रतिनिधी) उदगीर शहरातील अत्यंत गजबजलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या सह्याद्री हॉटेलच्या जवळ, किराणा दुकानातून साहित्य खरेदी करत असताना, “तू विशाल भाईला ओळखत नाहीस का?” असे म्हणत फिर्यादीच्या हातातील नऊ हजार रुपये बळजबरीने काढून घेऊन याची वाचता केल्यास किंवा पोलिसात गेल्यास जिवंत सोडणार नाही. आशी धमकी दिल्याची घटना घडली आहे.
या संदर्भात पोलीस सूत्राकडून हाती आलेली माहिती अशी की, बालाजी सुवर्णकार (वय तीस वर्ष धंदा किराणा दुकान रा. गुरधाळ ता. देवणी) हे उदगीर शहरातील सह्याद्री हॉटेल जवळील जे.पी. ट्रेडर्स येथून किराणा दुकानासाठी आवश्यक असणारे साहित्य खरेदी करत असताना, विशाल कांबळे रा. गांधीनगर उदगीर याने फिर्यादीस, तू” विशाल भाईला ओळखत नाहीस का?” असे म्हणून चाकूचा धाक दाखवून दहशत निर्माण करून फिर्यादीने साहित्य खरेदी करण्यासाठी आणलेले नऊ हजार रुपये त्याच्या हातातून बळजबरीने काढून घेऊन फिर्यादी आणि त्याच्या मित्राला जर तुम्ही पोलिसांना सांगितले तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही. अशी धमकी दिली. अशा आशयाची तक्रार बालाजी सुवर्णकार यांनी दिल्यावरून उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.न. 179 /23 कलम 392, 397 भारतीय दंड विधान संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दुपारी दोन ते सव्वा दोन वाजण्याच्या दरम्यान घडलेल्या या घटनेमुळे शहरात चांगलेच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोठ्या शहरातील भाईगिरीचे लोन आता उदगीर शहरातही पसरले की काय? अशी शंका निर्माण होत आहे. अशा प्रकारामुळे शहरातील सर्वसामान्य ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड हे करत आहेत.