निवृत्तीराव सांगवे यांची एम आय एम च्या विभागीय सचिव पदी निवड

निवृत्तीराव सांगवे यांची एम आय एम च्या विभागीय सचिव पदी निवड

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर येथील सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे महाराष्ट्र प्रभारी तथा नगर परिषदेमध्ये दोन वेळा नियोजन व विकास सभापती राहून उत्कृष्ट कार्य केलेले निवृत्तीराव (सोनकांबळे) सांगवे यांची निवड एमआयएमच्या प्रदेशाध्यक्षांनी मराठवाडा विभागाच्या सचिव पदी केली आहे. निवृत्तीराव सांगवे यांचे आज पर्यंतचे संघटन कौशल्य आणि संघटन बांधणीतील काम विचारात घेऊन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आल्याचे एम आय एम चे नेते खा. इम्तियाज जलील त्यांनी सांगितले. उदगीर नगरपालिकेच्या निवडणुकांच्या दरम्यान गेल्यावेळी सहा नगरसेवक एम आय एम चे निवडून आणले होते. तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा निसटता पराभव झाला होता. या गोष्टीचा विचार करून सांगवे यांची निवड करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.

आपल्या निवडीच्या संदर्भात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना निवृत्तीराव सांगवे यांनी स्पष्ट केले की, पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो विश्वास सार्थ करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू. पक्ष संघटनेशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांची फळी उभारून, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विजय संपादन करण्याच्या दृष्टीने सर्वांचे सहकार्य घेऊन नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली विकास आराखडा तयार करून, जनतेसमोर जाणार आहे. विकासाच्या केवळ गप्पाच नव्हे तर प्रत्यक्ष कृतीत आणून आपण यापूर्वी काम केले आहे. पुढेही सकारात्मक दृष्टिकोन ठेवून विकास करण्याच्या दृष्टीने वाटचाल करणार आहे. पक्षश्रेष्ठींनी जो विश्वास दाखवला त्याचे गांभीर्य विचारात घेऊन पक्ष संघटन वाढीसाठी जनसंपर्क वाढवणे आणि युवकांचे संघटन उभे करणे, या दृष्टीने आपण काम करू. पक्षश्रेष्ठींना खाली मान घालावी लागेल असे कोणतेही कृत्य आपल्या हातून कदापि होणार नाही.अशी ग्वाही याप्रसंगी त्यांनी दिली.

About The Author