शरदचंद्रजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी पुन्हा भक्कम करणार – प्रा. शिवाजी मुळे

शरदचंद्रजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी पुन्हा भक्कम करणार - प्रा. शिवाजी मुळे

उदगीर (एल.पी.उगीले) : देशाचे धुरंदर नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आशीर्वादाने लातूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद पुन्हा निर्माण करण्याच्या उद्देशाने युवकांची फळी उभा करणार. निष्ठावान आणि पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या युवकांना योग्य सन्मान दिला जाईल. त्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल. असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार गट) चे उदगीर तालुका अध्यक्ष प्रा. शिवाजीराव मुळे यांनी दिले. ते उदगीर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते शंकरराव मुक्कावार यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
याप्रसंगी युवराज जोमदे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या (सेवादल विभाग) मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा यथोचित सत्कारही करण्यात आला. या सत्कार सोहळ्याच्याप्रसंगी रामभाऊ हाडोळे, डॉ. बापूसाहेब पाटील, आजीम दायमी, शंकरराव मुक्कावार, शिवाजीराजे केंद्रे, साजिद कुरेशी इत्यादी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी पुढे बोलताना प्रा. शिवाजीराव मुळे यांनी स्पष्ट केले की, येणाऱ्या निवडणुका जिंकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून शरदचंद्रजी पवार यांचे हात बळकट करण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. ही लढाई स्वाभिमानाची असून महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे. याची जाण प्रत्येकाने ठेवावे, असेही आवाहन शिवाजीराव मुळे यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!