समर्थ विद्यालयात ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते बंदिस्त सभागृहाचे भूमीपूजन
उदगीर : तालुक्यातील एकुर्का रोड येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बुधवारी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांच्या मार्फत मंजूर झालेल्या बंदिस्त प्रेक्षागृहाचे भूमीपूजन बुधवारी क्रिडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री महाराष्ट्र राज्य ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थासचिव प्राचार्य प्रमोद चौधरी उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून लातूर जि. प. चे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, कृउबाचे संचालक प्रा. श्याम डावळे, माजी नगरसेवक गणेश गायकवाड, सरपंच चंद्रकलाबाई ज्ञानोबा कांबळे, राष्ट्रवादिचे जानीमियाँ शेख, उध्दव भोसले याच्यांसह परिसरातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हा. चेअरमन, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना ना. बनसोडे म्हणाले की, मतदार संघातील जनतेच्या आशीर्वादाने कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. या पदाचा वापर मतदार संघाचा चौफेर विकास करण्यासाठी करणार आहे. क्रीडामंत्री काम करत असताना जिल्ह्यातील शाळांना भरीव निधी उपलब्ध करून देत विद्यार्थ्यांना खेळात पारंगत करणार आहे. यासाठी एकुर्का रोड येथील समर्थ विद्यालयात ४० लक्ष रुपयाचे अत्याधुनिक बंदिस्त सभागृहाचे भूमीपूजन होत आहे. भविष्यात या सभागृहात विविध खेळ मुलांना खेळता येणार आहेत. प्रास्ताविक प्रा. एम. व्ही. स्वामी यांनी केले. आभार अमर जाधव यांनी मानले.