श्रीनिवास रामानुजन जयंती निमित्त राष्ट्रीय गणित दिवस साजरा
उदगीर (एल.पी.उगीले) : श्यामार्य कन्या विद्यालयात श्रीनिवास रामानुजन जयंती निमित्त राष्ट्रीय गणित दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पर्यवेक्षक प्रवीण भोळे ,प्रमुख पाहुणे सतनप्पा हुरदळे, गणित विषय विभाग प्रमुख संजीव पाटील, मीनाक्षी ऐणिले, वैशाली अनकल्ले, योगेश्वरी माने, राहुल गुरमे, विजयकुमार बैले हे मंचावर उपस्थित होते, गणित हे विज्ञान, अभियांत्रिकी, औषधशास्त्र, तसेच अर्थशास्त्र आणि समाजशास्त्रासारख्या ज्ञानाच्या विविध शाखांमध्ये जगभर वापरले जाते. या शास्त्रात गणिताचा वापर करणारी गणिताचीच उपयोजित गणित ही शाखा नवीन गणिती शोधांना प्रेरणा देते, आणि त्यांचा वापर करते. त्यामुळे ज्ञानाच्या सर्वस्वी नवीन शाखाही उदयास येतात, असे प्रास्ताविका मधून मीनाक्षी ऐणिले यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय गणित दिनानिमित्त रांगोळी स्पर्धा, गणिती कोडे, गणिती चारोळ्या, गणिती गीत गायन, भाषण अशा विविध उपक्रमामध्ये जवळपास 150 विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवलेला होता.
२२ डिसेंबर रोजी भारतात दरवर्षी राष्ट्रीय गणित दिवस साजरा केला जातो. प्रसिद्ध गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्मदिन निमित्त हा दिवस साजरा केला जातो. गणिताच्या विविध क्षेत्रांमध्ये आणि शाखांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारे ते जगप्रसिद्ध गणितज्ञ होते. रामानुजन हे प्रचंड बुद्धिमान होते. त्यांनी गणिताला केवळ वेगळी ओळखच दिली नाही तर अनेक प्रमेये आणि सूत्रे दिली. जी आजही अतिशय उपयुक्त मानली जातात. गणिताच्या क्षेत्रातील त्यांच्या अभूतपूर्व योगदानाची दखल घेऊन त्यांचा जन्मदिवस ‘गणित दिवस’ किंवा ‘राष्ट्रीय गणित दिवस’ म्हणून साजरा केला जातो, असे अध्यक्ष समारोपातून प्रवीण भोळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीहरी निडवंचे तर आभार वैशाली अनकल्ले यांनी मानले.