२५ डिसेंबर रोजी कुरुळा येथे समता संदेश पदयात्रेचा उद्घाटन सोहळा

0
२५ डिसेंबर रोजी कुरुळा येथे समता संदेश पदयात्रेचा उद्घाटन सोहळा

उदगीर (एल.पी.उगीले) : प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी समता संदेश पदयात्रेचा उद्घाटन सोहळा दिनांक 25 डिसेंबर सोमवारी सकाळी 11 वाजता राजयोग गार्डन मंगल कार्यालय,दैठणा रोड कुरुळा ता.कंधार जि.नांदेड येथे संपन्न होणार आहे.या कार्यक्रमास परमपूज्य सद्गुरु डॉ.सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर यांची उपस्थिती लाभणार आहे. या पदयात्रेचे उद्घाटन मुखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार तुषार राठोड यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरक यांच्या प्रेरणेने चालू झालेल्या या पदयात्रेचे सेवा समिती प्रमुख भगवान चिवडे यांनी आपल्या निवेदनात म्हणटले की, १२ व्या शतकात म. बसवण्णांनी या देशात समतेचा पाया रचला. त्याच समता आंदोलनातील एक तेजस्वी नायक म्हणजे शरण ऊरिलींग पेद्दी. ऊरिलींग पेद्दी हे पुर्वाश्रमीचे होलार जातीचे होते. कालौघातच इथल्या व्यवस्थेने शुद्र व अतीशुद्र ठरवलेल्या असंख्य शुद्र जातीपैकी एक जात. त्या होलार जातीत जन्माला आलेला पेद्दी हा नांदेड शहरात केवळ अस्पृश्यतेमुळे चोरी करुन स्वता:चा उदरनिर्वाह करत होता. पुढे चालून पेद्दी हा बसव विचारांनी प्रभावीत होऊन अनुभव मंटपाचा शरण बनतो ! आचार-विचारांच्या बळावर जंगम बनतो. शरण ऊरिलींग पेद्दींच्या आचार-विचाराच्या निष्ठेला पाहून म.बसवण्णांनी पेद्दींना नांदेड जिल्ह्यातील कंधारच्या लिंगायत मठाचे धर्मगुरु म्हणून घोषित केले. जंगम प्रचारक धर्मगुरु ऊरिलींग पेद्दी यांनी लोक जाग्रतीचे मोठे कार्य केले. शेकडो लिंगायत मठांची स्थापना करुन सदाचाराचा व समतेचा प्रचार केला. अर्थगर्भीत असे असंख्य वचने लिहली. १२ व्या शतकात एका होलार जातीत जन्माला आलेली एक व्यक्ती आपल्या आचार-विचारांच्या बळावर जंगम बनते. तो लिंगायत धर्मगुरु बनतो. ही या विश्वातील एक क्रांतीकारी घटना आहे. समतेची ही क्रांतीकारी घटना लिंगायतांसाठी तर भूषणावह आहेच पण त्याच बरोबर सामाजिक समरसतेच्या चळवळीला प्रेरणादायी आहे. या प्रेरणादायी लिंगायत इतिहासाचे स्मरण संपूर्ण जगाला करुन देण्यासाठीच लिंगायत समाजाचे नेते व सुप्रसिद्ध बसव कथाकार शिवानंद हैबतपूरे यांच्या नेतृत्वाखाली या पदयात्रेचे आयोजन केले असल्याचे पदयात्रा सेवा समितीचे अध्यक्ष भगवान चिवडे यांनी सांगितले.
आपल्या निवेदनात भगवान चिवडे यांनी सांगितले की, चालु वर्ष हा या समता संदेश पदयात्रेचे १० वे वर्ष असून यात महात्मा बसवेश्वरांच्या समतावादी विचारांना मानणारे वेगवेगळ्या जातीधर्माचे लोक मोठ्या प्रमाणावर सहभागी होत असतात. दरवर्षी या समता संदेश पदयात्रेत प्रबोधनाचे वेगवेगळे विषय असतात. चालू वर्षी या समता संदेश पदयात्रेत भारतीय संविधान एक राष्ट्रीय वरदान , लिंगायत समाजाचा ज्वलंत इतिहास, बसववादी शरण व मन्मथादी संत साहित्य प्रचार हा प्रबोधनाचा विषय असून या पदयात्रेत याविषयावर वेगवेगळ्या तज्ञ अभ्यासकांचे व्याख्याने होणार आहेत. ७ दिवसांची ही बसव विचारांची पदयात्रा केवळ धार्मीक नसुन सामाजिक समतेची पदयात्रा आहे. ही पदयात्रा दोन राज्यातील तीन जिल्हे व तेरा तालुक्यातील हजारो लोकांना प्रबोधित व संबोधीत करते. ही पदयात्रा कुरुळा येथून प्रस्थानित होऊन ,दिग्रस,जांब,जळकोट, पाटोदा,कोळनूर,तिरुका,घोणसी,नळगीर,पिंपरी,उदगीर,बामणी,मोघा,तोगरी,सावरगाव,संगम,देवणी,आंबेगाव,वडमुरंबी,अट्टरगा,मेहकर,हुलसूर,बेलूर,बेटबालकुंदा मार्गे बसवकल्याण येथे दि.३१ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता पोहंचते. दि.२५ डिसेंबर रोजी संपन्न होत असलेल्या उद्घाटन सोहळ्यास अध्यक्ष म्हणून बसव अनुभव मंटप समिती महाराष्ट्र चे अध्यक्ष हणमंतप्पा औरादे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार गंगाधरजी पटणे ,शिवसेना राज्य संघटक एकनाथ पवार , वंचित बहूजन आघाडीचे नेते शिवाभाऊ नरंगले, शिवसेना नेते मुक्तेश्वर धोंडगे, काँग्रेस कमिटी जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर, राष्ट्रवादी नेते मनोहर भोसीकर, काँग्रेस कमिटी कंधार तालुका अध्यक्ष बालाजी पाटील पंडागळे, भाजपा महिला मोर्चा नेत्या चित्रलेखा गोरे, राष्ट्रवादी यूवा नेते शिवकुमार भोसिकर, भाजपा नेते कंधार भगवान राठोड, गंगाप्रसाद यन्नावार,शिवसेना तालुका प्रमुख परमेश्वर जाधव, भारतीय जनता पक्ष यूवा मोर्चा चे मुखेड तालुका अध्यक्ष हेमंत खंकरे, सुप्रसिद्ध उद्योजक सचिन हुडे, उदगीर न.प.माजी नगरसेवक मनोज कपाळे आदी उपस्थित राहणार असून यात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहाण्याचे आवहान भगवान चिवडे यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *