मुला मुलींनी सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिक्षण घ्यावे – माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांचे प्रतिपादन
अहमदपूर (गोविंद काळे) : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी जिवंतपणे मुलींच्या शिक्षणासाठी खूप मोठ्या प्रमाणात हाल अपेष्टा सहन केल्या, त्यामुळे त्यांचे नाव सबंध देशभर आदराने घेतले जाते. त्यामुळे शालेय जीवनामध्ये मुला-मुलींनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्य कर्तत्वाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपले जीवन घडवावे असे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांनी केले. ते दि. तीन रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित यशवंत विद्यालया च्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य गजानन शिंदे, योगशिक्षिका कलावती ताई भातंबरे, उप मुख्याध्यापक राजकुमार घोटे, पर्यवेक्षक राम तत्तापुरे, अशोक पेदेवाड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. या समयी योग शिक्षिका कलावती भातंबरे, सहशिक्षिका वर्षाताई माळी यांनी व विद्यालयातील निवडक मुलींचे सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर मार्गदर्शनपर अशा स्वरूपाची भाषणे झाली. प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक राम तत्तापूरे यांनी सूत्रसंचालन कपिल बिराजदार यांनी तर आभार धनंजय तोकले यांनी मानले.