लेखिका साहित्य संमेलनाची अहमदपूरकरांना मेजवानी संमेलन अध्यक्षपदी एड. उषा दराडे यांची निवड
अहमदपूर (गोविंद काळे) : जानेवारी महिन्यात नवव्या लेखिका साहित्य संमेलनाची अहमदपूरकरांना चांगलीच मेजवानी मिळणार असून या साहित्य संमेलनात कथाकथन, परीसंवाद , निमंत्रित कवयित्रींचे कवी संमेलन होणार असून मराठवाड्यातील नामवंत लेखिका साहित्यिक यात सहभागी असल्यामुळे अहमदपूर परिसरातील साहित्य रसिकांना चांगलीच मेजवानी मिळणार आहे .यामुळे तालुका आणि परिसरात आनंदाची लहर आहे. 20 आणि 21 जानेवारीला होणाऱ्या या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बीड येथील सुप्रसिद्ध लेखिका आणि उषा दराडे यांची निवड झाली असून संमेलनाचे उद्घाटक म्हणून जळगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे या उपस्थित राहणार आहेत. कॉ श्रीनिवास काळे स्मृती प्रतिष्ठान व मसाप शाखा अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या नवव्या लेखिका साहित्य संमेलनाचे आयोजन येथील संत जनाबाई साहित्यनगरी संस्कृती सभागृहामध्ये होणार आहे.
साहित्याचा मोठा वारसा असलेल्या अहमदपूर तालुक्यात मराठी साहित्याची आवड व जाण असलेली रसिक मंडळी खूप मोठ्या प्रमाणात आहेत.
दोन दिवशीय या लेखिका साहित्य संमेलना च्या पहिल्या दिवशी 20 जानेवारी रोजी सकाळी ग्रंथ दिंडी निघणारा सोनशश आहे याची सुरुवात सुप्रसिद्ध लेखिका ललिता गादगे यांच्या हस्ते होणार आहे, तर सकाळी दहा वाजता उद्घघाटन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या मुख्यमंचावर लेखिका प्रतिभा शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
दुपारी बारा ते दोन या वेळात पहिल्या परिसंवादात मराठी कादंबरी आणि मराठवाड्यातील स्त्री कादंबरी लेखन या विषयावर परिसंवाद होणार असून त्याच्या अध्यक्षपदी सावित्रा चिताडे( परभणी) या आहेत तर सहभाग डॉ. जयदेवी पवार, संजीवनी नेरकर, द्रौपदी पंदीलवाड, दीपा बियाणी, आशिया चिस्ती ,शारदा देशमुख यांचा आहे. दुपारी दोन ते तीन या वेळात कथाकथन असून अध्यक्षपदी सरोजा देशपांडे( परभणी) या आहेत , सहभाग अनिता येलमटे, रत्नमाला मोहिते, पुष्पा दाभाडे, सुनीता गुंजाळ, अनुपमा बन, व डॉक्टर सत्यशीला यांचा आहे. सायंकाळच्या थंड वातावरणात निमंत्रितांचे कवी संमेलन होणार असून त्याच्या अध्यक्षपदी डॉ. उर्मिला चाकूरकर( पैठण) या आहेत तर संजीवनी तडेगावकर, शैलजा कारंडे ,वैशाली पाटील, विमल मुदाळे, गौरी देशमुख, चंद्रमुखी बोळेगावे, वर्षा माळी मीना तोवर, कल्याणीराणी देशमुख ,नीता मोरे ,तृप्ती अंधारे यांच्या सह जवळपास 50 नामांकित कवयित्रीचा सहभाग आहे.
दुसऱ्या दिवशी 21 जानेवारी रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत विद्यमान तंत्रज्ञान आणि माध्यमातील स्त्री प्रतिमा या विषयावर परिसंवाद होणार असून याच्या अध्यक्षपदी प्रा समिता जाधव ह्या आहेत तर सहभाग विद्या बयास, अनुजा डोईफोडे, शर्मिष्ठा भोसले ,रेखाताई हाके, शैलजा बरुरे, वैशाली कोटंबे यांचा राहणार आहे. या नवव्या लेखिका साहित्य संमेलनाच्या स्वागतअध्यक्षा म्हणून कार्य प्रतिष्ठानच्या ॲड ज्योती काळे ह्या आहेत .या नवव्या लेखिका साहित्य संमेलनामुळे अहमदपूर आणि परिसरातील साहित्य क्षेत्रात कमालीची उत्सुकता असून साहित्याची चांगलीच मेजवानी अहमदपूरकरांना मिळणार हे मात्र निश्चित आहे.