पत्रकारांनी निर्भीडपणे धाडसाने प्रामाणिकपणे कार्य करावे – आमदार बाबासाहेब पाटील
अहमदपूर (गोविंद काळे) : पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून पत्रकारांनी निर्भीडपणे, धाडसाने व प्रामाणिकपणे कार्य करावे असे प्रतिपादन आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले. ते तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील लालासाहेब काकडे सभागृहात दर्पण दिनानिमित्त आयोजित पत्रकार सत्कार समारंभ कार्यक्रमात अध्यक्षिय स्थानावरून बोलत होते. यावेळी मंचावर भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील, मंचकराव पाटील उपसरपंच सुरज पाटील, माधवराव पाटील शिवानंद तात्या हेगणे, जोंधळे गोपीनाथ, निवृत्ती कांबळे आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना आ. बाबासाहेब पाटील म्हणाले की, पत्रकारांनी निर्भीडपणे व प्रामाणिकपणे पत्रकारिता केली पाहिजे कोणाच्याही दबावाखाली जाऊन पत्रकारिता करणे हे चुकीचं आहे. समाज व देश हिताच्या दृष्टिकोनातून पत्रकारिता केली पाहिजे. इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट इंडिया यामुळे पत्रकारितेचे स्वरूप आज बदललेले आहे. पत्रकारांमुळे प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी सतर्कपणे काम करतात हे खूप महत्त्वाचे आहे. जनसामान्यांच्या अधिकारासाठी पत्रकारिता केली पाहिजे. गोर-गरीब, कष्टकरी, मजदूर यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आम्ही डोक्यावर तुळशी पत्र घेऊन काम करत आहोत याच प्रकारचे कार्य पत्रकारांनी करावी अशी अपेक्षाही त्यांनी शेवटी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच सुरज पाटील यांनी केले. सूत्रसंचालन धम्मपाल सरवदे यांनी केले तर उपस्थितांचे आभार शिवानंद तात्या हेगणे यांनी मानले. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.डी. जी. माने, डॉ. एन. एस. पाटील, मुख्याध्यापक दीपक भराडे, डॉ. माधव दामाजीवाले, प्रा. रत्नाकर निळेगावकर, मेघराज गायकवाड आदींनी परिश्रम घेतले. यावेळी अहमदपूर चाकूर तालुक्यातील पत्रकार बांधव परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.