बहुचर्चित खून प्रकरणातील आरोपीला हैदराबाद मधून अटक, स्थानिक गुन्हे शाखा व विवेकानंद चौक पोलीस स्टेशन ची संयुक्त कारवाई.

0
बहुचर्चित खून प्रकरणातील आरोपीला हैदराबाद मधून अटक, स्थानिक गुन्हे शाखा व विवेकानंद चौक पोलीस स्टेशन ची संयुक्त कारवाई.
लातूर (एल.पी.उगीले) : संपूर्ण लातूर जिल्ह्यात बहुचर्चित राहिलेला विवेकानंद पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेला खुनाचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि विवेकानंद चौक पोलीस स्टेशनच्या संयुक्त कारवाईत उघड झाला असून आरोपीला हैदराबाद येथून अटक करण्यात आले आहे. यासंदर्भात पोलीस सूचना करून हाती आलेली थोडक्यात माहिती अशी की, पोलीस ठाणे विवेकानंद चौक हद्दीतील ताजुद्दिन बाबा नगर, लातूर परिसरात दिनांक 06/01/ 2024 रोजी मध्यरात्री कुणीतरी अज्ञात आरोपीने दर्गा परिसरात झोपलेला फारुख उर्फ मुकड्या सुजातली सय्यद याचा अज्ञात कारणासाठी तीष्ण हत्याराने, डोक्यात,गळ्यावर, हातावर मारहाण करून खून केल्याची घटना घडली होती.  त्यावरून पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 12/ 2024 कलम 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचा तपास विवेकानंद चौक पोलीस करीत होते.

सदर गुन्ह्यातील मयत हा सराईत व रेकॉर्ड वरचा गुन्हेगार होता. विविध पोलीस ठाण्याला संबंधित मयतावर शरीराविषयी व मालाविषय अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. तसेच तो गुंड प्रवृत्तीचा असल्याने अनेकांशी त्याचे शत्रुत्व होते. त्यामुळे त्याचा खून नेमका कोणी व कशामुळे केला यासंदर्भात मोठ्या प्रमाणात संभ्रम होता. तसेच परिसरातील नागरिकाकडून गुन्ह्याच्या तपासात काही एक उपयुक्त माहिती मिळत नव्हती.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सदर गुन्ह्याचा उलगडा करून गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी मार्गदर्शन व सूचना करीत होते. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे ,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (लातूर शहर) भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले व विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे व पोलीस ठाणे विवेकानंद चे संयुक्त पथक तयार करून गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेण्यात येत होता.
दरम्यान पथकाकडून रेकॉर्डवरील अनेक गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस करण्यात येत होती. सदर पथकाला मिळालेल्या गोपनीय व सायबर सेल कडून मिळालेल्या तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून, नमूद गुन्ह्यातील संशयित आरोपी हा हैदराबाद येथे लपून बसलेला असल्याची माहिती मिळाली.
त्यावरून संयुक्त पथकातील पोलीस उपनिरीक्षक अनिल कांबळे, पोलीस अमलदार रियाज सौदागर, योगेश गायकवाड व आनंद हल्लाळे यांचे पथक तात्काळ तेलंगना राज्यातील हैदराबाद येथे रवाना होऊन हैदराबाद मधील बोराबंडा परिसरात सापळा लावून अतिशय सीताफिने नमूद गुन्ह्यातील संशयित आरोपीला दिनांक 11/01/2024 रोजी ताब्यात घेऊन पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे आणले.
पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे आणून सदर संशयित आरोपीला विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव समीर उर्फ जालीम अखिल शेख, (वय 24,वर्ष राहणार ,साळे गल्ली,बौद्ध नगर, लातूर).असे असून रात्री झोपलेल्या फारुख उर्फ मुकड्याच्या खूनाच्या कारणाची विचारपूस केली असता नमूद मयत खर्चासाठी वारंवार पैशाची मागणी करीत होता. समीर याने मयताला अनेक वेळा पैसेही दिले. परंतु नमूद मयत समीर कडे रोजच पैशाची मागणी करू लागला होता. पैसे न दिल्यास तो समीरला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत होता. याला कंटाळून समीरने रात्रीच्या वेळी उघड्यावर झोपलेल्या फारूक उर्फ मुकड्या याच्या डोक्यात फरशी घालून व नंतर गळ्यावर चाकूने मारून खून केल्याचे सांगितले.
समीर उर्फ जालीम अखिल शेख याला पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून समीर याचे विरुद्ध याआधी पण पोलीस ठाणे गांधी चौक येथे जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे विवेकानंद चौक चे सहाय्यक पोलीस निरीक्षक नाना लिंगे व पोलीस अमलदार वाजिद चिखले हे करीत आहेत. सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात व उपविभागीय पोलीस अधिकारी (लातूर शहर) भागवत फुंदे, स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वातील संयुक्त पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लेवाड, नाना लिंगे, घारगे पोलीस उपनिरीक्षक अनिल कांबळे, केंद्रे ,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार रियाज सौदागर,योगेश गायकवाड, राजेश कंचे,पोलीस ठाणे विवेकानंद चे पोलीस अमलदार आनंद हल्लाळे, रमेश नामदास, वाजिद चिखले, सायबर सेलचे पोलीस अमलदार गणेश साठे,शैलेश सुडे यांनी केली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *