रामेश्वर येथे २२ जानेवारी रोजी भव्य शोभा यात्रा हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे – आ. कराड
लातूर : लाखो करोडो भाविकांची श्रद्धा असलेल्या अयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्य दिव्य मंदिर उभे राहत आहे. या निमित्ताने २२ जानेवारी २०२४ सोमवार रोजी देशभर आनंद उत्सव साजरा केला जात आहे. लातूर तालुक्यातील मौजे रामेश्वर (रुई) येथील श्रीराम मंदिरात विविध कार्यक्रमासह भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली असून या शोभायात्रेत हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपाचे नेते आ. रमेशअप्पा कराड यांनी केले आहे. आजही भारतीयांच्या मनावर प्रभू श्रीराम अधिराज्य करतात. माता-पित्याप्रती श्रद्धा, प्रेम, बंधुभाव, मैत्री, पत्नी प्रेम, कुटुंब वत्सलता, पीडित शोषितांचा उद्धार संघटन अभेद योद्धा शिष्य शिरोमणी अशा एक ना अनेक विशेषांनी उल्लेखली जाणारी देवता पुरातन काळातील असली तरी वर्तमानातही वेगवेगळ्या संदर्भात उल्लेख केला जातो. कित्येक वर्ष बंदिस्त असलेल्या रामलल्ला न्यायालयाच्या आदेशान्वये हक्काच्या जन्मभूमी परिसरात अति भव्य प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर अयोध्या नगरीत उभे राहताना बघणे हा प्रसंगच प्रत्येकाच्या जीवनातील अविस्मरणीय ठरणारा आहे. यानिमित्ताने देशभर गुड्या उभारून दारी दिवे लावून आनंद उत्सव साजरा करण्यात येत आहे. श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना निमित्ताने देशभर आनंद उत्सव साजरा होत असतानाच लातूर तालुक्यातील मौजे रामेश्वर (रुई) येथील मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम मंदिरात २२ जानेवारी २०२४ सोमवार रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे असे सांगून भाजपाचे नेते आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की सकाळी आठ वाजता पंधरा फूट उंचीच्या प्रभू श्रीराम मूर्तीची भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली असून या शोभायात्रेत विविध गावचे भजनी मंडळी टाळकरी वारकरी पताके घेऊन मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाची मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी करण्यात येत आहे. शोभा यात्रेचा समारोप ह.भ.प. संजय महाराज साखरे यांच्या कीर्तनाने होणार असून कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा मोठ्या भक्तिमय वातावरणात निघणाऱ्या शोभायात्रेत सर्व स्तरातील नागरिकांनी महिला पुरुषासह तरुणांनी हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान आ. रमेशअप्पा कराड यांनी केली आहे