ग्रामविकासाची आदर्श गावे तीर्थक्षेत्रे व्हावीत – प्राचार्य डॉ.सोमनाथ रोडे
उदगीर : (एल.पी.उगीले) : तरुणाईमध्ये परिवर्तनाचे सामर्थ्य असते. देशाच्या राज्याच्या कर्तृत्वावर आपला ठसा उमटविण्याची क्षमता तरुणांमध्ये असते. तरुणांनीच निर्माण केलेली ग्राम विकासाची आदर्श केंद्रे म्हणून नावारूपाला आलेली राळेगणसिद्धी, हिवरे बाजार, पाटोदा, कडवंची यासारखी गावे तीर्थक्षेत्रे व्हावीत, असे मत सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे यांनी व्यक्त केले. ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार युवक शिबिर उद्घाटन समारंभ प्रसंगी मौजे सताळा येथे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी हे होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उदगीरचे उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, राष्ट्रीय सेवा योजनेचे लातूर जिल्हा समन्वयक डॉ. केशव आलगुले, नायब तहसीलदार संतोष धाराशिवकर, संस्थेचे उपाध्यक्ष ऍड. प्रकाश तोंडारे, सचिव रामचंद्र तिरुके, सरपंच कुसुमबाई तिरकोळे, उपसरपंच सचिन सुडे, प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, डॉ. मल्लेश झुंगास्वामी यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. सोमनाथ रोडे म्हणाले, तरुणाईमध्ये परिवर्तनाचे सामर्थ्य असते. उक्ती आणि कृतीमध्ये अंतर न ठेवणारा तरुण असतो. संकल्प आणि सिद्धीमध्ये साधर्म्य निर्माण करणारा तरुण असतो. त्यामुळे तरुणांनी निराश न होता आत्मविश्वासाने पुढे जावे, असे आवाहन उपस्थित विद्यार्थ्यांना केले. उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे म्हणाले ग्रामीण समस्यांचा भाग होऊन समस्या कशा सोडवाव्यात यासाठीचे एक व्यासपीठ म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर असते. शिबिरातून नेतृत्वाचा विकास होतो. शिबिरातील सहभागी विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृतीसाठी प्रभात फेरी काढून राष्ट्रीय कार्यात हातभार लावावा. राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डॉ. केशव आलगुले म्हणाले, व्यक्तिमत्व विकास आणि नेतृत्व गुणांना चालना देण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून केले जाते. शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी विधायक उपक्रमांची सुरुवात आपल्या स्वतःच्या घरापासून करावी, असा मौलिक सल्ला दिला. संस्थेचे उपाध्यक्ष ऍड. प्रकाश तोंडारे म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक व गावकऱ्यांनी सामूहिकपणे श्रमदान करावे. सचिव रामचंद्र तिरुके म्हणाले, विद्यार्थ्यांच्या आयुष्याला संस्काराचे वळण देण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजना शिबिर करत असते. विद्यार्थ्यांनी ग्रामीण संस्कृतीशी एकरूप व्हावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौरभ गोणे यांनी तर आभार डॉ. बालाजी होकरणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाधिकारी डॉ. बंकट कांबळे, डॉ. सुनंदा भद्रशेट्टे, डॉ. शफिका अन्सारी, डॉ. अर्चना मोरे, डॉ. पुष्पलता काळे, डॉ. गौरव जेवळीकर यांनी पुढाकार घेतला.