विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात नम्रता,शिस्त, संयम व परिश्रम घेवून चिकित्सकपणे अभ्यास करावा – आय ए एस अधिकारी नमन गोयल यांचे प्रतिपादन
अहमदपूर (गोविंद काळे) : सद्यस्थितीला मानवी जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात सर्वच क्षेत्रांमध्ये स्पर्धा निर्माण झाल्याचे सांगून जीवनात चौफेर यशस्वी होण्यासाठी नम्रता, शिस्त,संयम व परिश्रम घेवून बालवयातच अत्यंत चिकित्सकपणे मन लावून अभ्यास करावा असे आग्रही प्रतिपादन आय ए एस अधिकारी श्री नमन गोयल यांनी केले. ते दि. 17 रोजी संत ज्ञानेश्वर विद्यालयात अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला आणि मानस फाउंडेशन जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाच्या महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस तथा संस्था सचिव प्राचार्या रेखाताई तरडे-हाके, व्यासपीठावर प्राचार्य चंद्रशेखर कळसे, कथा मालेचे जिल्हा संयोजक राम तत्तापूरे, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी एन.डी.राठोड, प्रा.डॉ.अनिल मुंढे, मुख्याध्यापिका आशा रोडगे, मुख्याध्यापिका मीना तौर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी श्री नमन गोयल पुढे बोलताना म्हणाले की, बाल वयातच नियोजनबद्ध अभ्यास, वाचन, चिंतन,मनन महत्वाचे असल्याचे सांगून शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात सोशल मीडियापासून सावध रहा, नियमितपणे आहार व आरोग्याकडे विशेष लक्ष द्या, व्यसनापासून दूर राहा, मोठ्यांचा आदर, सन्मान करा असे जाहीर आवाहन केले. अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्या रेखाताई तरडे-हाके यांनी अध्यापन पद्धतीमध्ये कथाकथनाला अनन्य साधारण महत्त्व असल्याचे सांगितले. जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेत बाल गटात सर्वप्रथम धैर्यशील मुळे, द्वितीय संस्कृती पाटील, तृतीय अभिलाष निरगुडे तर किशोर गटात जिल्ह्यात प्रथम तनिष्का गुळवे , द्वितीय श्रेया तत्तापुरे , तृतीय जय गोरगे आले आहेत. या स्पर्धेचे निरीक्षक म्हणून कवी एन.डी. राठोड, प्रा.डॉ.अनिल मुंडे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा संयोजक राम तत्तापूरे यांनी केले. सूत्रसंचालन संगीता आबंदे यांनी तर आभार मुख्याध्यापिका आशा रोडगे यांनी मानले. कार्यक्रमाची सुरुवात साने गुरुजी यांच्या ‘खरा तो एकची धर्म’ या प्रार्थनेने करण्यात आली आणि सांगता पसायदानाने करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.