एस.पी.साहेब अहो जरा आमच्याकडे बी बघा, आम्ही कुणाकुणाचा त्रास सहन करायचा??

0
एस.पी.साहेब अहो जरा आमच्याकडे बी बघा, आम्ही कुणाकुणाचा त्रास सहन करायचा??

एस.पी.साहेब अहो जरा आमच्याकडे बी बघा, आम्ही कुणाकुणाचा त्रास सहन करायचा??

लातूर (प्रतिनिधी) : एस.पी.साहेब आम्ही अगोदरच अठरा विश्व दारिद्र्य अंगी-नशिबी घेऊन लाखो प्रवाशांच्या जीवाचे रक्षण करत आमची नौकरी सहीसलामत करत जीव मुठीत घेऊन जगतो. परंतु लातूरात प्रवेश केला की जीव थर्ररच….करतोय बघा…! तेंव्हा जरा आमच्याकडे बी बघा……!! आहो आम्ही कुणाकुणाचा त्रास सहन करायचा……??
आम्ही एस.टी.बस चालक (ड्रायव्हर)–वाहक नौकरी दरम्यान अख्ख्या महाराष्ट्रभर फिरत असतोत. अनेक मोठमोठ्या शहरात प्रवाशांना नेमून दिलेल्या थांब्यावर सोडतोत. आणि प्रवासी उतरताच पुढच्या मार्गाला लागतोत. परंतु तुमच्या लातूरातील ॲटोधारकांची प्रवासी मिळवण्याची पद्धत जरा अफलातूनच आहे बघा….! लातुरच्या चारही दिशेने कुठल्याही बाजूने शहरात शिरकाव करताना ॲटोधारक एस.टी. बस उभी राहते न राहते तोपर्यंत ऑटोने बसला असाकाही घेराव घालतात की.., अनेकदा चक्क बसचे दार उघडणे ही कठीण होते. शिवाय वाहकाकडून सुट्टे राहिलेले शिल्लक पैसे घेण्यासाठी खाली उतरून उभा राहण्यासाठी प्रवाशांना जागाही शिल्लक राहत नाही. तर कसेबसे हे सारे पार पाडून बस हलवायची झाली तर, बसच्या समोर पाच-दहा ऑटो अशाप्रकारे आडवे उभे केले जातात की, एक तर त्यांना प्रवासी मिळाल्याशिवाय किंवा त्यांच्या मनात आल्याशिवाय ते काही केल्या बाजूलाच होत नाहीत.
साहेब या प्रकाराचा केवळ आम्हालाच नाही तर, प्रवाशांनाही फार त्रास होत आहे. आमच्या सोबत त्यांचाही वेळ वाया जात असल्याने प्रवासी ॲटोवाल्यांना एक ब्र-शब्दही न बोलता आम्हाला…..लाखोली वाहत आहेत. यामुळे एखाद्या वेळेला एखाद्या ऑटोधारकास थोडफार बोलण्याचा प्रयत्न केला तर समोरून होणारे शब्दसुमनांचे स्वागत वरतून निराळेच…..! ‌ अगोदरच क्षमतेपेक्षा बसमधील वाढत्या गर्दीने होणारी चिडचीड आणि वरतून ॲटोवाल्यांची लाखोली स्वीकारत वेळ प्रसंगी आमची गच्ची पकडून होणारी शिवीगाळ, वेळेत कोणी हस्तक्षेप नाही केला तर, तक्रार-बिक्रार केल्यास होणारी मारहाण किंवा मारहाणीच्या धमक्या याने जीव पुरता घाबरून जातोय हो….! आमचे घर-दार सारकाही सोडून आम्ही हजारो मैलांचा प्रवास करतो. आम्हाला कोणीच वाली नाही हो……!! त्यातच तुमच्या लातुरात विशेषत: अंबेजोगाईकडून लातुर मधे प्रवेश करताना मेडिकल, साईनाका, रेणापुर नाका या तिन्ही थांब्यावर ऑटो चालकांचा होणारा महाभयंकर त्रास यामुळे मुळातच वैतागलेले आम्ही खंडीभर निरनिराळ्या त्रासाला सामोरे जात आमची नौकरी ईमानेइतबारे करत आहोत. परंतु त्यातच जर आमचा एखादा त्रास कमी होण्याऐवजी त्यात भरच पडत असेल तर, आम्ही जगायचे की मरायचे आता तुम्हीच सांगा…..! आपण अत्यंत कर्तव्यदक्ष आणि कडक शिस्तीचे आहात असे आम्ही ऐकून आहोत. तेंव्हा आम्ही आपल्या पोलिस खात्या इतके मोठे नसलो, आपले कुणीही नसलो तरी, तुमची-आमची वर्दी सारखीच आहे. तेंव्हा त्या वर्दी पायी तरी आमचे थोडेसे दर्दी होऊन आमच्या आहेत त्याच अडचणीत वाढ करत आमच्या बस समोर वेडी-वाकडी ॲटोंची गर्दी करणाऱ्यांना कृपया शिस्त लावा एवढीच आमची आपणास बेंबीच्या देठापासून आर्तहाक आहे.
तेंव्हा खरंच कुलींप्रमाणे ” सारी दुनिया का बोज हम उठाते है…! ” असं म्हणत लाखो प्रवाशांचा बोज सहन करत त्यांची ने-आन करणाऱ्या या चालकांची-वाहकांची लातूरात होत असलेली कुचुंबना लातुरचे पोलीस अधीक्षक (एस.पी.) सोमय मुंडे यांच्या पर्यंत पोहोचेल का….? आणि ती पोहोचली तर अनेक पुरस्कार प्राप्त असलेले शिस्तीचे अगदी कडक आणि निर्णयात कठोर एस.पी. ही छोटी परंतु मोठी वेदनादायी समस्या तात्काळ सोडवतील का….?? याकडेच आता लातुरची ड्युटी करणा-या एस.टी.च्या वाहक-चालकांसह हजारो प्रवाशांचे डोळे लागून आहेत………!!!!!.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *