बौद्ध धम्म परिषदेच्या नावाने राजकीय दुकानदारी चालउ नका – निवृत्ती सांगवे
उदगीर (एल.पी. उगिले) : बौद्ध धम्म परिषदेच्या नावावर खासदार सुधाकर शृंगारे यांनी राजकीय प्रचाराचा शुभारंभ ठेवल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. गेली साडेचार वर्ष खासदार सुधाकर शृंगारे यांनी बौद्ध धम्माकडे आणि विशेषतः उदगीर विधानसभा मतदारसंघाकडे डुंकूनही पाहिले नाही. मात्र आता निवडणुकीची हालचाल सुरू होताच, बौद्ध धम्म परिषदेच्या नावावर आपला वैयक्तिक प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने कार्यक्रम ठेवला असल्याचा आरोप उदगीर नगरपालिकेचे माजी नियोजन व विकास सभापती तथा दलित पॅंथरचे प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे महाराष्ट्र प्रमुख आणि एम आय एम चे विभागीय सचिव निवृत्तीराव सांगवे यांनी केला आहे.
बौद्ध समाजाला भावनिक बनवून मते लाटायची आणि स्वार्थ संपला की, या समाजाकडे पुन्हा पाठ फिरवायची आणि मनुवाद्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचे, हे आता थांबले पाहिजे. समाज जागृत होऊ लागला आहे. समाजातील जाणकार तरुण पिढीला अशा स्वार्थी प्रवृत्तीच्या राजकीय नेत्यांची चीड येऊ लागली आहे. ज्यांनी आपल्या साडेचार वर्षाच्या कारकिर्दीत उदगीर विधानसभा मतदार संघासाठी किंवा बौद्ध धर्मातील कार्यकर्त्यासाठी, तरुण पिढीसाठी काहीच केले नाही, केवळ मनुवादी चळवळ पोसण्यासाठी आपला वापर होतोय हे कळत असून देखील त्यांनाच साथ देणारे राजकारणी लोक धम्माचे काहीच भले करू शकत नाहीत. हे आता स्पष्ट झाले आहे. त्यांना मते मागायचे असतील तर त्यांच्या त्यांच्या विकास कामाच्या जोरावर किंवा त्यांनी समाजासाठी काय केले? त्या कामाच्या जोरावर मागावीत, मते मागण्यासाठी धम्म परिषदेचे आयोजन अत्यंत चुकीचे आहे, असेही निवृत्तीराव सांगवे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.
बौद्ध धम्म परिषद आणि या परिषदेच्या निमित्ताने येणारे भन्तेजी यांचा आशीर्वाद घेण्याचे नाटक करून ग्रामीण भागातील भोळ्या भाबड्या जनतेची दिशाभूल करण्याचे पाप करू नये, कारण भारतीय जनता पक्ष सर्व आघाड्यावर अपयशी ठरला आहे. प्रत्येक वेळी नव्या नव्या घोषणा करायच्या, मोठ मोठी आश्वासनांची खैरात वाटायची, आणि जनतेला फसवायचे. कधी जाती-जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करायची नाहीतर कधी धार्मिक भावना निर्माण करून राजकीय स्वार्थ साधायचा, हे आता राजकारणी पुढाऱ्यांनी थांबवले पाहिजे. आणि फक्त समाज हितासाठी काही करता आले तर निस्वार्थ भावनेने कार्य करावे. असेही आवाहन निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे) यांनी केले आहे.