शाहूवाडी (प्रतिनिधी) : अवीट गोडी असलेली मराठी ही आपल्या महान अशा महाराष्ट्राची खरी ओळख आहे. मराठी भाषा आपली मातृभाषा असून तिच्या अमूल्य वैभवाचे जतन, संवर्धन करण्याची नैतिक जबाबदारी प्रत्येक मराठी माणसाची असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते प्रा. शिवाप्पा पाटील यांनी केले. मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त शाहूवाडी न्यायालयात शुक्रवार (ता. १९) रोजी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायाधीश अमोल शिंदे होते. अध्यक्ष स्थानावरून बोलताना न्यायाधीश श्री. शिंदे म्हणाले की, नभोमंडळात सूर्य, चंद्र-तारे आहेत तोपर्यंत मराठी भाषेचे अस्तित्व अबाधित असेल. वकिलांनी कायद्याची पुस्तके तर वाचावीतच शिवाय दर्जेदार मराठी साहित्याचे वाचन करावे, असेही आवाहन न्यायमूर्ती ए. एस. शिंदे यांनी केले.
‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ या विषयावर हृदयसंवाद साधताना प्रा. शिवाप्पा पाटील पुढे म्हणाले की, मायबोली मराठीचा ज्ञानभाषा म्हणून वापर वाढला पाहिजे. मराठी भाषेची सध्या होणारी गळचेपी, अधोगती थांबवायची असेल तर आधी मराठी शाळांची अधोगती थांबवायला हवी, असेही श्री. पाटील म्हणाले.
ॲड. कृष्णा पोवार यांनी प्रास्ताविक केले. दरम्यान साहित्यिक प्रा. डॉ. प्रकाश नाईक, ज्येष्ठ विधीज्ञ अजित खटावकर, डॉ. झुंजार माने यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी न्यायाधीश शारदा बागल, सरकारी वकिल सविता चिमटे - कोरे, ॲड. सुनील साळुंखे, ॲड. बी. बी. शिंगण, ॲड. वाय. ए. शेळके, ॲड. विक्रम बांबवडेकर, ॲड. ए. एस. चौगुले, ॲड. श्रद्धा पाटील, ॲड. जे. एस. काकडे, गणेश पाटील, हणमंतराव कवळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन तुकाराम डोंगरे यांनी केले.