महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे जीवन व कार्य हे उपेक्षित राहिले – डॉ. महेश मोरे.
उदगीर (प्रतिनिधी) परकीयांची सत्ता आणि वर्ण वर्चस्वाच्या काळात राष्ट्र आणि धर्म विकासात लोकसेवेसाठी स्वार्थाला लाथाडून अवमान, अपमान व बहुमान यांचा विचार न करता स्वतःची भूमिका आणि कार्यावरील अढळ निष्ठेने चंदनासारखे झिजणारे अस्पृशोद्धारक, स्त्रीस्वातंत्र्य आणि धर्मप्रसारा बरोबरच समाज शिक्षणासाठी डिप्रेसड क्लासेस मिशनच्या माध्यमातून अतुलनीय समाजसेवा करणारे कर्मवीर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे जीवन व कार्य हे उपेक्षितच राहिले असे मत डॉ. महेश मोरे यांनी व्यक्त केले.
चला कवितेच्या बनात या नियमितपणे चालू असलेल्या 305 व्या वाचक संवाद मध्ये डॉ महेश मोरे संचालक राजमुद्रा अकॅडमी लातूर यांनी गो.मा. पवार लिखित महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, जीवन व कार्य या साहित्यकृतीवर संवाद साधताना ते म्हणाले की, शिक्षणाला व समाजसेवेला परिस्थिती अडसर ठरू शकत नाही. हे दाखवून देत सयाजीराव गायकवाड, तुकोजीराव होळकर, भांडारकर, रानडे आदींच्या साह्याने आपली बहीण जनाआक्का वरील अन्याय दूर सारत परमेश्वर आणि सद्सद्विवेकबुद्धीला साक्ष ठेवून ऐतिहासिक सत्य आणि सामाजिक वास्तव यांना मुक्तीशील लोकहितपर भूमिकेतून सामोरे जात सर्वांगीण सम्यक व सत्यनिष्ठ मुक्तीच्या दृष्टीने कार्य करताना कुठलाही पक्ष किंवा पंथाच्या आधीन न राहता स्वतःला समाजाप्रती समर्पित करणारे महर्षी इतिहासात ज्यांच्या सर्वगामी असाधारण कार्याची उंची, बुद्धिवादी विद्वत्ता, अस्सल आणि तटस्थ चरित्र लाभून देखील ज्या समाजात जन्मले त्या समाजाची उदासीनता तर ज्या समाजासाठी आयुष्य वेचले त्यांचे दुर्लक्ष याबरोबरच त्या वेळचे विचारवंत, संशोधक, समाजसेवक आणि सवतासुभा पाळणाऱ्या ब्राह्मणोत्तरांनी व समाजसेवकांनी देखील उपेक्षाच केली.
या कार्यक्रमाचे संचालन आनंद बिरादार यांनी केले. पाहुण्यांचा परिचय संयोजक अनंत कदम यांनी करून दिला तर आभार डॉ. ज्ञानोबा मुंडे यांनी मानले.