मताची विक्री नव्हे दान व्हावे – प्रा. शिवाप्पा पाटील

0
मताची विक्री नव्हे दान व्हावे - प्रा. शिवाप्पा पाटील
शाहूवाडी(प्रतिनिधी) : हल्ली पक्षीय राजकारणात घोडेबाजार पाहायला मिळत असून मतांचा बाजार करणाऱ्या उमेदवारांच्या प्रलोभनास जनता बळी पडत आहे. परिणामस्वरूप, मतविक्रीमुळे निवडणूकीसारख्या राष्ट्रीय उत्सवाला निराशेने ग्रासले असल्याची खंत प्रा. शिवाप्पा पाटील यांनी व्यक्त केली. दरवर्षी २५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. सांप्रत वर्षीच्या १४ व्या राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून शाहूवाडी तहसील कार्यालयाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात 'लोकशाही समजून घेताना..' या विषयावर प्रा .पाटील प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार रामलिंग चव्हाण होते. निवडणूक नायब तहसीलदार रवींद्र मोरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. निवडणूकीतील नवमतदार व ऐंशी वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांच्या मतांची टक्केवारी वाढली पाहिजे, युवकांनी पुढे येऊन निःपक्ष, भयमुक्त वातावरणात मतदान करावे, असे आवाहन तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी केले.
पुढे बोलताना प्रा. शिवाप्पा पाटील यांनी मतदार दिनाच्या इतिहासावर प्रकाश टाकला. लोकशाहीत बहूमताला महत्त्व असून मतदार लोकशाहीची प्रचंड मोठी ताकद आहे. यास्तव आपले एक मत  अमूल्य आहे याचे भान मतदारांनी ठेवून आपले मत न विकता, वाया न घालवता विवेकबुद्धीने त्याचे दान करावे, असे मत प्रा. शिवाप्पा पाटील यांनी व्यक्त केले. नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वांचा पुरस्कार करुन आपापसात संवाद साधला पाहिजे तरच भारतीय लोकशाही एका उंचीवर पोहचेल, असेही श्री. पाटील म्हणाले. दरम्यान मतदार दिनानिमित्त सर्वांना शपथ देण्यात आली. तसेच निवडणूकीच्या अनुषंगाने उत्कृष्ट निरंतर कामगिरी करणाऱ्या शिक्षक, तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक, बीएलओ आणि तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्या हस्ते प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. 
प्रा. हणमंत जवळे यांनी सर्वांचे आभार मानले. तहसीलदार कार्यालयाचे अमर सुतार, सीमा पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *