मराठी भाषा व साहित्य वाढीसाठी साहित्यिकांना प्रोत्साहन द्यायला हवे – प्रा.नामदेव गरड
उदगीर (एल.पी.उगीले) : मातृभाषा ही हृदयाची भाषा असते. आपण आपल्या भावना मातृभाषेतूनच चांगल्या पद्धतीने व्यक्त करू शकतो. महाराष्ट्रातील संतांनी नैतिकतेची शिकवण दिलेली आहे. साहित्यात राजकारण न आणता मराठीच्या अभ्यासक्रमात अभिजात व प्रेरणा, संस्कार देणारे साहित्य असायला हवे. तसेच शासनाकडूनही मराठी भाषा व साहित्यिकांना समाधानकारक प्रोत्साहन मिळत नाही अशा प्रकारची खंत प्रा. नामदेव गरड यांनी व्यक्त केली.
श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ.एन.जी. एमेकर यांच्या मार्गदर्शनानुसार प्रसिद्ध कथाकार, कीर्तनकार व चित्रपट समीक्षक तसेच श्यामलाल महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रा.नामदेव गरड यांची प्रकट मुलाखत ‘मराठी भाषेचे सामर्थ्य व भवितव्य’ या विषयावर मराठी विभागाचे प्रमुख डॉ. सुशीलप्रकाश चिमोरे व डॉ. म. ई. तंगावार यांनी घेतली.
विविध प्रश्नाला उत्तर देताना प्रा,नामदेव गरड म्हणाले, इंग्रजांनी सगळ्या देशावर राज्य केले. त्यामुळे इंग्रजी साहित्य जगात परिचित झाले. मराठीत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व संत एकनाथ या संताबरोबरच आधुनिक काळातील नारायण वामन टिळक, हरिभाऊ आपटे, भा.रा.तांबे, पु.ल.देशपांडे व चारुता सागर इत्यादी कितीतरी प्रतिभावंत साहित्यिक होऊन गेलेले आहेत. यांच्या साहित्याचे भाषांतर इतर भाषेत झाल्यास निश्चितच मराठी भाषेचे वैभव लक्षात येईल. परंतु दुर्दैव असे की दूरदृष्टीचा अभाव व राजकारण यामुळे चांगले साहित्य कुठेतरी बाजूला राहत आहे,अशी खंत व्यक्त करीत त्यांनी एक तास श्रोत्यांना अंतर्मुख केले.
यावेळी डॉ.डी.आर.होनराव, प्रा.गणेश बिरादार, प्रा.सुदर्शन मसुरे, डॉ.के.के. मुळे, श्री संदीप सूर्यवंशी आदी प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.