विद्यार्थ्यांनी राष्ट्रहिताबरोबर संस्कृती रक्षणाचे कार्य करावे – श्री.रमेश मनसूरे
देवणी (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांनी महाविद्यालय जीवनामध्ये आत्मविश्वासाने वावरले पाहिजे. कोणतेही व्यसन न करता ध्येयप्राप्तीसाठी कष्ट केले पाहिजे. आपले गुरु व आई वडिलांचे विचार जोपासण्याचे कार्य केले पाहिजे, तसेच राष्ट्रहिताबरोबर संस्कृती रक्षण व संवर्धनाचे कार्य केले पाहिजे. असे प्रतिपादन सेवानिवृत्त शिक्षक श्री. रमेश मनसुरे यांनी केले. कै. रसिका महाविद्यालय देवणी व मौजे आंबेगाव ता. देवणी यांच्या संयुक्त विद्यमाने आंबेगाव येथे दिनांक २४ ते ३० जानेवारी दरम्यान आयोजित केलेल्या “युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास” या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. मुक्ताबाई केरबा सूर्यवंशी उपस्थित होत्या. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत जावळे, ग्रामपंचायत सदस्य श्री. व्यंकट शिंदे, ग्रामसेवक एन. एम.स्वामी, श्री. सचिन पाटील, मुख्याध्यापक एस. के. जानकीकर, रासेयो विद्यार्थी प्रतिनिधी कु. दीक्षा सुरवसे, समीर शेख यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. गोपाळ सोमाणी यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ चंद्रकांत जावळे व श्री. व्यंकट शिंदे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रज्वलन करून या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना गीताचे गायन रावळे आरती, रावळे स्वाती, रावळे वैष्णवी यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रंचालन प्रा. डॉ. प्रशांत भंडे यांनी केले. आभार डॉ.पी. आर मोरे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना सहकार्यक्रमाधिकारी डॉ. विजय मोरे, सदस्य डॉ. सुलोचना डेंगाळे विद्यार्थी प्रतिनिधी दीक्षा सुरवसे यांनी सहकार्य केले. या निमित्ताने मतदार दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या वतीने गावातून रॅली काढण्यात आली. तसेच मतदार जनजागरणानिमित्त घोषणा देऊन ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यात आले. या कार्यक्रमास गावातील नागरिक, महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.