अहमदपूर तालुक्यासह सकल मराठा समाजाचा आनंदोत्सव- उत्साहाने व जल्लोषात साजरा
सगे सोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्याची मागणी मान्य ; ओबीसींच्या सर्व सवलती मराठा समाजाला.
अहमदपूर (गोविंद काळे) : गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाला ओबीसी मधुन आरक्षण देण्यात यावे यासाठी फार मोठा संघर्ष सुरू होता. यानंतर चार ते पाच महिन्यापासून मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष सुरू आहे.आझाद मैदान मुंबई कडे जाताना उपोषण सुरू असता वाटेत मुंबई जवळील वाशी येथे छत्रपतींच्या पुतळ्याच्या समोर अखेर मागणीला फार मोठे ऐतिहासिक यश प्राप्त झाले आहे. यांच्या न्याय मागणीला व सर्व मागण्या मान्य करून यांना ज्यूस पाजवुन यांचे उपोषण सोडण्यात राज्याचे कर्तव्यनिष्ठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आले असून यांनी आरक्षण मागण्याच्या अध्यादेशाची समक्ष प्रत दिली. ही माहिती अहमदपूर शहरात समजताच छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करीत बँड च्या तालावर तरुनाई ने फार मोठा आनंदोत्सव उत्साहाने व जल्लोषात साजरा केला.
आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील हे आपल्या न्याय मागण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी निघाले असता वाशी -मुंबई येथे राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाऊन छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून शिवरायांच्या साक्षीने मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देत असल्याचा अध्यादेश जरांगे पाटील यांना सुपूर्द केला. या मराठा समाजाच्या मागण्यांमध्ये सगे सोयऱ्यांना शपथपत्रावर प्रमाणपत्र देण्याची मागणी मान्य, वंशावळी शोधण्यासाठी तालुका पातळीवर काम सुरू, ओबीसी साठीच्या शैक्षणिक व इतर सर्व सवलती मराठा समाजाला देणार ,मराठा आरक्षणाबाबत कायदा करणार ,मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेणार ,मराठ- वाड्यातील नोंदीसाठी गॅझेट काढणार ,रक्ताच्या सगे सोयऱ्यांना सजातीतील विवाहातून तयार झालेले नातेसंबंध, कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समितीला मुदतवाढ आदी मागण्यासह इतर मागण्याच्या बाबतीत मनोज जरांगे पाटील ठाम होते. यावर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सर्व मागण्या मान्य करून मराठा समाजासाठी हा सुवर्णक्षण असल्याचे सांगून यावेळी एकमेकांना पेढे भरविण्यात आले.
मुंबई जवळ वाशी येथे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे ,मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील ,ना. गिरीश महाजन, नामदार दीपक केसरकर ,नामदार लोढा यांच्यासह मंत्री , आमदार, अधिकारी, पोलीस अधिकारी व सकल मराठा बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे म्हणाले की मराठा समाजाच्या एकजुटीचा हा विजय असून समाजाने आज पर्यंतचे सर्व आंदोलने शिस्तीत ,कुठेही गालबोट न लागता यशस्वी केले आहेत. आपल्या न्याय व हक्कासाठी इतरांना त्रास होणार नाही याची खूप काळजी घेतलेली आहे. मराठा समाजाच्या गरीब मुलांची जाणीव आहे. गरिबांच्या मुलांच्या हितासाठी हा निर्णय घेतलेला आहे. ओबीसी समाजाचे सर्व अधिकार ,सवलती दिल्या जाणार आहेत.मी शब्द पाळणारा मुख्यमंत्री असून छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देणार असे सांगितले होते. अखेर आज शिवरायांच्या पुतळ्यासमोरच शब्द पाळण्याचे आणि हा फार मोठा ऐतिहासिक क्षण असल्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सांगितले. हा निर्णय मतासाठी नाही तर मराठा समाजाच्या मुलांच्या हितासाठी घेतला असल्याचेही आवर्जून यावेळी सांगितले.
अहमदपूर सह तालुक्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी भीमराव कदम, सुधीर गोरटे , देवानंद मुळे ,प्रा.डॉ. रोहिदास कदम, सोमेश्वर कदम, शैलेश जाधव,सतीश नवटके ,शिवाजी पाटील आंधोरीकर, मुकेश पाटील , धीरज भंडे ,परमेश्वर सूर्यवंशी ,प्रा. दत्ता गलाले ,प्रा. गोविंद शेळके ,शंकर मुळे ,गजानन गंगथडे ,दयानंद पाटील ,शेखर जाधव, भास्कर सूर्यवंशी ,अशोक चापटे , राजू बोडके ,अर्जुन गंगथडे , सिध्दार्थ दापके ,राम पाटील ,रामदास कदम ,पुरुषोत्तम माने, शिवानंद भोसले, संजय माने ज्ञानोबा भोसले आदींसह मराठा बांधवांनी पुढाकार घेतला होता.