मतदान हा श्रेष्ठ अधिकार – डॉ. दत्ताहरी होनराव
उदगीर (एल.पी.उगीले) : वयाची अठरा वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीला घटनेने मतदानाचा अधिकार दिला आहे. पण त्यांना मतभान देण्यासाठी निर्वाचन आयोगाच्या ६१ व्या वर्धापन दिनी २०११ ला हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्याचे व मतदारांना मतभान देण्याचे ठरले. तेव्हापासून हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. निष्पक्ष निवडणूका होण्यासाठी मतदार जागृत असला पाहिजे. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य व श्रेष्ठ अधिकार आहे, असे अभ्यासपूर्ण विचार प्रा. डॉ. दत्ताहरी होनराव यांनी मांडले. ते महाराष्ट्र उद्यगिरी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात मौजे सताळा येथे ‘मतदान आणि मतभान’ या विषयावर बौद्धिक सत्रात बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव रामचंद्र तिरुके हे होते. याच कार्यक्रमात प्रा.राजेंद्र चव्हाण यांनी भारतीय संविधान व मुलभूत कर्तव्य या विषयावर मार्गदर्शन केले. नागरिकांनी केवळ हक्क व अधिकाराविषयी न बोलता कर्तव्य व जबाबदारी याविषयीही जागृत राहणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले. यावेळी मंचावर प्रा. डॉ. गौरव जेवळीकर, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. बालाजी होकरणे, डॉ बंकट कांबळे, डॉ. पुष्पलता काळे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांनी केले. संचालन रोहित भिंगे तर आभार नागेश पाटील यांनी मानले. यावेळी विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.