कौशल्य विकास प्रशिक्षणानातून शेळीपालकाची आर्थिक भरभराट – देविदास भाटकुळे यांची यशोगाथा
उदगीर (प्रतिनिधी) नागलगाव ता. उदगीर येथील रहिवासी श्री. देविदास संग्राम भाटकुळे यांच्या परिवारामध्ये पत्नी सौ. विमलबाई देविदास भाटकुळे तसेच दोन मुली व एक मुलगा आहे. त्यांचेकडे स्वतःची जमीन नसल्याने त्यांची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. अशा परिस्थितीत मुलींचे व मुलाचे शिक्षण, मुलींचे लग्न कसे करावे या सर्व अडचणींना बघून ते हताश झाले होते. पारंपारिक शेळीपालन करीत असल्याने अधिक माहिती मिळविण्यासाठी त्यांनी पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर येथील कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक डॉ. मंगेश वैद्य यांचेशी संपर्क साधला. डॉ. वैद्य यांनी त्यांना महाविद्यालयात आयोजित शेळीपालन व्यवसायासंबंधीत विविध प्रशिक्षणांमध्ये सहभागी करून घेतले. या प्रशिक्षणांमधून शेळयांची निवड, अर्ध-बंदिस्त शेळीपालन, शास्त्रोक्त शेळीपालन, आरोग्य व आहार व्यवस्थापन, विपणन व्यवस्थापन इ. विषयी सखोल माहिती घेऊन त्यांनी अधिक जोमाने शेळीपालन व्यवसायास सुरुवात केली.
शेळीपालन व्यवसायाची सुरुवात त्यांनी दोन हजार रुपयाला एक शेळी विकत घेऊन केली होती. सुरुवातीस त्यांनी कुठलेही मार्गदर्शन किंवा प्रशिक्षण घेतलेले नव्हते. तथापि, सन २०१९ मध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र, उदगीर अंतर्गत शेळीपालन विषयक प्रशिक्षणामध्ये सहभाग घेऊन त्यांनी विविध विषयावर शेळीपालन विषयक मिळविलेल्या ज्ञानाच्या आधारे एक शेळीपासून ३० शेळ्यापर्यंत वाढ केली. या व्यवसायासाठी कुठल्याही पद्धतीचे शासकीय अनुदान किंवा कर्ज घेतले नव्हते. शेळीपालनातून मिळालेल्या उत्पन्नाच्या आधारे त्यांनी मुलांचे शिक्षण व मुलीचे लग्न केले. तसेच छोटेसे टुमदार घरही बांधले आहे. या व्यवसायात त्यांना पत्नी व मुलगा मदत करतात.
सुरुवातीला त्यांना शेळीपालन व्यवसायामध्ये करडांची मरतूक, शेळ्या गाभडणे, संसर्गजन्य आजार, करडांची विक्री इ. अडचणी आल्या परंतु पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ञांचे मार्गदर्शनाच्या सहाय्याने त्यांनी सर्व अडचणीवर मात केली. सध्या त्यांनी शेळ्यांसाठी एक गोठा सुद्धा बांधलेला आहे. वर्षाकाठी शेळीपालन व्यवसायातून ऐंशी हजार रुपयाचे उत्पन्न ते घेतात.
या यशाचे श्रेय ते पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ञांना देतात. भविष्यामध्ये शेळयांची संख्या ५० पर्यंत वाढविण्याचे त्यांचे ध्येय आहे. शेळीपालन व्यवसायातून मिळालेल्या उत्पन्नामुळे त्यांचे राहणीमान सुधारले असून समाजातील पतही वाढली आहे.