गणेश राम गायकवाड शेळीपालनातून यशस्वी व्यावसायिक बनले
लातूर (प्रतिनिधी) रायखोड , ता. भोकर (नांदेड) येथील रहिवासी श्री. गणेश राम गायकवाड यांचे शिक्षण फक्त १२ वी. पर्यंत झाले. ते अल्प भूधारक आहेत. रोज मोल मजुरी करू स्वतःचा व कुटुंबाचा खर्च चालवतात. त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी, मुले व त्यांचे आई वडिल आहेत. त्यांची घरातील परिस्तिथी बिकट असल्या मुळे ते १२ वी. नंतरचे शिक्षण पूर्ण करू शकले नाही. सुरुवातीला त्यांनी बाहेर कुठे तुटपुंज्या पगाराची नौकरी भेटते का यासाठी प्रयत्न केले, परंतु ते सफल झाले नाहीत. घरामध्ये त्यांच्या आई व वडील यांना जनावरे पाळण्याची आवड होती. त्यातूनच त्यांच्या मनात जनावरांविषयी प्रेम निर्माण झाले. त्यामुळे ते जनावरे पालनाकडे वळले. पशुपालना विषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, येथील डॉ. जी. आर. चन्ना व डॉ. एल.एस. कोकाटे यांच्याशी संपर्क साधला. नियमित संपर्कातून त्यांना शेळीपालन व्यवसाय बद्दल रुची निर्माण झाली. यानंतर श्री. गायकवाड यांनी महाविद्यालायातील तज्ञांकडून जनावरांची निवड, शास्त्रोक्त शेळीपालन, आधुनिक गोठा निर्मिती, चारा पिके लागवड, जनावरांचे आरोग्य व आहार व्यवस्थापन, विपणन व्यवस्थापन इ. विषयी सखोल माहिती घेऊन शेळीपालन व्यवसायास सुरुवात केली.
सदरील शेळीपालनासाठी त्यांनी कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतला नाही. कमी लागत मध्ये सुरुवातीला १० शेळ्या व एक नर घेऊन त्यांनी २०२० मध्ये व्यवसाय सुरु केला. सध्या त्यांच्या कडे ६० शेळ्यांचा कळप आहे. व्यवसायात त्यांना चारा, पाणी, खाद्य, गोठ्यांची सफाई इत्यादी कामांमध्ये आई, वडील, पत्नी व मुले मदत करतात. व्यवसायात आलेल्या तांत्रिक अडचणींवर त्यांनी पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे मात केली. महाविद्यालयातील तज्ञांनी त्यांना लसीकरण, चारा पिके लागवड, आहार व आरोग्य व्यवस्थापन, बदलत्या ऋतुत घ्यावयाची काळजी इ. बाबत मार्गदर्शन केले.
शेळ्यांच्या उत्पादनातून खर्च वजा जाता त्यांना मासिक १५ ते १८ हजार रुपये उत्पन्न मिळत आहे. या यशाचे श्रेय ते पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ञांना देतात. भविष्यामध्ये आणखी शेळ्या विकत घेऊन शेळी उत्पादन वाढविण्याचे ध्येय आहे. शेळी पालन व्यवसायातून मिळालेल्या उत्पन्नामुळे त्यांचे राहणीमान सुधारले असून समाजातली पतही वाढली आहे.
श्री. गणेश राम गायकवाड यांनी शेळी पालन व्यवसायातून केलेल्या प्रगतीने प्रोत्साहित होऊन गावातील अनेक होतकरू युवक शेळीपालन व्यवसायाकडे वळले असून गावातील शेळी व्यवसायास चालना मिळाली आहे.