वलांडीतील सहा वर्षीय पिडीत चिमुकलीला राष्ट्रवादी काँग्रेस दत्तक घेणार : जिल्हाध्यक्ष संजय शेटे
लातूर (एल.पी.उगीले): देवणी तालुक्यातील वलांडी येथील अत्याचारित सहा वर्षीय चिमुकलीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दत्तक घ्यायचा निर्णय घेतला आहे. या बालिकेच्या शिक्षण व संपूर्ण भविष्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांनी दिली.
देवणी तालुक्यातील वलांडी येथील एका गरीब कुटुंबातील सहा वर्ष वयाच्या चिमुकलीवर आरोपी अल्ताफ कुरेशी ( वय २२ वर्ष ) याने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना समजताच समाजाच्या सर्वच स्तरातून त्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात येत आहे. या प्रकरणातील आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी जिल्हाभरात मूक मोर्चा, कँडल मार्चचे आयोजन करण्यात येत आहे. ही निंदनीय घटना समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांनी पिडीत चिमुकलीच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. यावेळी शेटे यांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून घडल्या प्रकरणाची माहिती दिली. त्यावेळी खा. सुप्रियाताई सुळे यांनी पिडीत चिमुकलीला दत्तक घेऊन तिच्या पुढील सर्व शिक्षण व भविष्याची जबाबदारी स्विकारण्यास तयार असल्याचे सांगितले. खा. सुप्रियाताई सुळे यांनी पिडीतेच्या आजी, आजोबा, वलांडी गावचे सरपंच रामभाऊ भंडारे व उपस्थित गावकऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संभाषण करून त्यांना धीर दिला, व न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असेल असे सांगितले.
यावेळी संजय शेटे यांच्यासमवेत देवणी तालुक्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अंकुश गायकवाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव महादेव आवाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिरूर अनंतपाळ चे शहराध्यक्ष संदिप धुमाळे, लातूर ग्रामीण विधान सभा अध्यक्ष मदन काळे, लातूर तालुका कार्याध्यक्ष बख्तावर बागवान, प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे सरचिटणीस निशांत वाघमारे, नरसिंग उदगीरकर, सामाजिक कार्यकर्ते अरूण पाटील, विशाल फुलारी, सुशान साबणे, योगेश उदगीरकर, गणेश चवाळे, आकाश गंगापुरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.