रंगकर्मी प्रतिष्ठानच्या माध्यमातून माणसातील सर्वोत्तम गुणांचा सन्मान – ह.भ.प. गहिनाथ महाराज औसेकर
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या आठ वर्षापासून कलावंत व विविध क्षेत्रातील राष्ट्रहित व समाजाला प्रेरित करणाऱ्या व्यक्तीच्या गुणांची पारख करून त्यांचा सन्मान केला जातोय, हा सन्मान सर्वोत्तम असल्याचे मत ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी व्यक्त केले. ते रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने शिवाजी महाविद्यालयात आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण व लघुपट महोत्सव पुरस्कार वितरण प्रसंगी बोलत होते. यावेळी राज्यातील विविध क्षेत्रातील आदर्श व कर्तृत्ववान व्यक्तींच्या पुरस्काराचे वितरण ह.भ.प गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक व भाजपाचे उदगीर शहराध्यक्ष मनोज पुदाले हे होते. तर सोहळ्याचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन संचालक डाॅ दिगंबरराव नेटके यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी अभिनेत्री प्रेरणा खरात, अभिनेते साहेबराव पाटील, दिग्दर्शक अनिलकुमार साळवे, अॅड दत्ताजी पाटील, माजी नगरसेवक अनिल मुदाळे, किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्ञानदेव झोडगे ,प्राचार्य सदानंद गोणे ,अभिजीत आवटे, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद नवले, मातृभूमी प्रतिष्ठानच्या सचिव प्राचार्य उषा कुलकर्णी, रंगकर्मी प्रतिष्ठानच्या सचिव प्रा. ज्योती मद्देवाड, गायकवाड ताई, वरवटे, सिद्धार्थ तायडे आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना ह भ प गहिनीनाथ महाराज म्हणाले, आपले घर सुद्धा एक रंगभूमीच असून जीवनात सुख – दुःख, आनंद येत असतात, त्याप्रमाणे आपण भूमिका वटवत असतो. राम आपल्यातच असतो, रावण आपल्यातच असतो, शंकर आपल्यातच असतो, भस्मासुरही आपल्यातच असतो.ते माणसातील चांगुलपण शोधून समाजाला प्रेरणा देणारे व देश हित जोपासणार्या मान्यवरांचा सन्मानाचे रंगकर्मी प्रतिष्ठानचे कार्य मोलाचे आहे.
यावेळी राज्यभरातील कला, साहित्य, कृषी, शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक रंगकर्मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. बीभीषण मद्देवाड यांनी केले, सूत्रसंचालन रसूल पठाण यांनी केले. तर आभार सिद्धार्थ सूर्यवंशी यांनी मांडले.
रंगकर्मी प्रतिष्ठान आयोजित ८ व्या लघुपट महोत्सवात डॉट व द मदर लव सर्वोत्कृष्ट लघुपट तर दान लघुपटास द्वितीय पुरस्कार, सर्वोत्कृष्ठ अभिनय पुरुष कमलेश सावंत (लघुपट बाप) , प्रशांत निकंबे (लघुपट ठिबिक), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री सुप्रिया पाटील ( लघुपट स्व अस्तित्व),द्वितीय स्नेहा कागणे (लघुपट बाजार ), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक प्रणव चटर्जी (लघुपट डॉट), द्वितीय विनय दुबे ( द मदर लव्ह ), सर्वोत्कृष्ट कथा व संवाद आनंद खाडे (लघुपट बाप), पी रमण द्वितीय प्रणव चटर्जी (लघुपट डाॅट), सर्वोत्कृष्ट बालकलाकार प्रथम रोहित महाडिक ( लघुपट दान), द्वितीय रोहिणी सूर्यवंशी (लघुपट दप्तर), सर्वोत्कृष्ट छायांकन प्रथम केबी शर्मा {लघुपट डॉट ), द्वितीय माधव नंदीवेडकर, (लघुपट ब्लॅक होल )यांना देण्यात आला. यावेळी शालेय विद्यार्थी, रसिक प्रेक्षकांनी चित्रपटाचा आनंद लुटला.
रंगकर्मी साहित्य, कला, क्रीडा प्रतिष्ठान व मराठी पत्रकार संघाच्या वतीने चंद्रचकोर कारखाने यांना जीवनगौरव पुरस्कार तसेच शोधवार्ता गटामधुन दै.सकाळचे जळकोट प्रतिनिधी विवेक पोतदार यांच्या ‘उमेदमुळे शेंद्रीय शेतीला प्रोत्साहन ‘ या बातमीला प्रथम तर व्दितीय देवणी येथील दै.देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी दत्ता पाटील तळेगावकर यांच्या ‘ शासनाने देवणी जातीच्या वळुला केलं हद्दपार ‘ आणि तृतीय उदगीर येथील दै.सकाळचे प्रतिनिधी संतोष जोशी यांच्या ‘ व्यवसायाकरिता कुठल्याही धर्माच्या व्यक्तीला मिळू शकते जातीचे प्रमाणपत्र’ या बातमीस जाहीर झाला, असुन उत्कृष्ट वार्ता गटात लातूर येथील दै.सोलापुर तरुण भारतचे प्रतिनिधी वामन पाठक यांच्या ‘जलसाक्षरता रॅली की, मतदार जोडी अभियान’ तर व्दितीय चाकूर येथील दै.देशोन्नतीचे प्रतिनिधी विकास स्वामी यांच्या ‘डोंबारी समाजातील महिलेला पंचायत समितीचा ध्वज फडकविण्याचा मिळाला मान’ तर तृतीय अहमदपुर येथील दै.देशोन्नतीचे प्रतिनिधी बाशिदखान पठाण यांच्या ‘ तोटा पंधराला घेता मग फडा ७० रूपयांना का नाही? ‘ या बातमीस तृतीय पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.