आई-वडिलांचे स्वप्न साकारण्यासाठी कठोर मेहनत करावी : डॉ. नेटके
उदगीर (एल.पी.उगीले) : पदवी हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीतील एक अत्यंत महत्त्वाचा असतो. अतिशय कष्टाने मिळालेली ही पदवी प्रत्येक विद्यार्थ्याला सन्मानाने देता यावी यासाठी महाविद्यालयीन स्तरावर पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभाचे आयोजन केले जात आहे. ही पदवी घेऊन विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करत समाजाच्या हितासाठी व एकूणच राष्ट्राच्या विकासासाठी आपले मोलाचे योगदान द्यावे, तसेच आपल्या आई-वडिलांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी. असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाचे नियंत्रक डॉ. दिगंबर नेटके यांनी व्यक्त केले. ते शिवाजी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव एकंबेकर उपस्थित होते. याप्रसंगी विचारपीठावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव पांडुरंग तुळशीराम शिंदे, उपाध्यक्ष माधवराव पाटील, सहसचिव कार्यकारी सदस्य रामराव एकंबे, ज्ञानदेव झोडगे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद नवले, कार्यक्रमाचे संयोजक डॉ. विश्वनाथ भालेराव इत्यादी उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. नेटके यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील संधींबद्दल सखोल मार्गदर्शन करताना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विश्वनाथ भालेराव यांनी तर अध्यक्षीय समारोप डॉ. अरविंद नवले यांनी केले. डॉ. अनुराधा पाटील व डॉ. उर्मिला सिर्शी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर डॉ. हनुमंत कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.