आमचा पक्ष शरद पवार साहेब ! आमचं चिन्हही पवार साहेबच – विनायकराव पाटील
अहमदपूर (गोविंद काळे) : निवडणूक आयोगाने दि. ६ जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निकाल घोषित केला. त्यात अजित पवार गटाला राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष हे नाव व चिन्ह देण्यात आले. या निर्णयावर महाराष्ट्राच्या अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या मात्र शरद पवार गटाच्या नेत्यांमध्ये प्रखर नाराजी दिसून आली अहमदपूर चाकूर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांच्या नेतृत्वात आज दिनांक ८ जानेवारी रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निवडणूक आयोग, केंद्र सरकार व राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करून या निर्णयाचा निषेध नोंदवला गेला.
याप्रसंगी बोलताना विनायकराव पाटील यांनी महाराष्ट्र राज्यातील वर्तमान सरकार व केंद्र सरकार वर सडकून टीका केली विनायकराव पाटील बोलताना म्हणाले की शिवसेना हि बाळासाहेब ठाकरे यांची असताना त्यांच्या विरोधात निकाल दिला गेला व एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना म्हणून उद्धव ठाकरे यांच्यावर अन्यायकारक निकाल थोपला गेला आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत ही असाच निकाल येईल हे आम्हाला आधीच ज्ञात होतं. परंतु आम्ही या निर्णयाने खचून न जाता न्यायालयीन लढाई तर लढूच पण जनतेच्या कोर्टातून मात्र आमच्या बाजूने निकाल लागेल याचा आम्हाला विश्वास आहे.
पंचवीस वर्षे ज्या पक्षाला शरद पवार यांनी उभे केले ज्या पक्षाचे संगोपन केले त्या पक्षाचे नाव व चिन्ह शरद पवार यांच्याकडून हिसकावून घेण्यात आले निवडणूक आयोग स्वायत संस्था राहिली नसून ती सत्ताधाऱ्यांच्या हाताखाली काम करत असल्याचे या सगळ्यातून दिसून येत आहे असा घणाघात विनायकराव पाटील यांनी यावेळी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.