प्रवाशांच्या खिशातील, पर्समधील मोबाईल, पैसे चोरणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक पाच मोबाईल जप्त
लातूर (एल.पी.उगीले) : पर्स,बॅग मधील मोबाईल व पैसे चोरणाऱ्या दांपत्या कडून 50 हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. पोलीस ठाणे निलंगा येथील पर्स चोरीचा एक गुन्हा उघड झाला आहे. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेची उत्कृष्ट कामगिरी झाली आहे.
याबाबत थोडक्यात माहिती अशी की, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये घडणाऱ्या चोरी व मलाविषयक गुन्हे उघडकीस आणण्या करिता मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलीस अधिकारी,अमलदारांचे पथक तयार करण्यात आले होते. सदर पथका मार्फत जिल्ह्यातील विविध गुन्हेगारांची माहिती एकत्र करून त्याचे विश्लेषण करण्यात येत होते. तसेच गोपनीय बातमीदार नेमून त्यांच्याकडून माहिती घेण्यात येत होती.
दरम्यान 10/02/2024 पोलीस पथकाला मिळालेल्या गोपनीय माहिती वरून चोरीचे मोबाईल कमी किमतीत विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांने त्यांचे नाव अजीम गौस शेख, (वय 25 वर्ष, राहणार मदनी नगर, लेबर कॉलनी जवळ, लातूर सध्या राहणार खाडगाव रोड,लातूर).असे असल्याचे सांगितले.
नमूद आरोपीला ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्याने सांगितले की, तो व त्याची पत्नी असे दोघे मिळून बसस्थानक, रेल्वेस्थानक येथे चढ-उतार करीत असताना गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांच्या पर्समध्ये, खिशामध्ये ठेवलेले पैसे व मोबाईल चोरीचे गुन्हे केल्याचे कबूल केले. तसेच सदरचे मोबाईल कमी किमतीत लोकांना विकत असल्याचे सांगितले. त्यावरून लातूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांचे अभिलेखाची माहिती घेतली असता पोलीस ठाणे निलंगा येथे पर्स व त्यामध्ये ठेवलेली 2,500 रुपयाची रोख रक्कम व एक मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल असल्याचा दिसून आला.
नमूद आरोपीने त्याच्या पत्नीसह मिळून गुन्ह्यात चोरलेला एक मोबाईल व इतर बसस्थानक रेल्वेस्थानकातून चोरलेले चार मोबाईल असे एकूण पाच मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. नमूद आरोपीला ताब्यात घेताच त्याची पत्नी फरार झाली असून तिचा शोध घेण्यात येत आहे. सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अमलदार रियाज सौदागर, मोहन सुरवसे, राजेश कंचे, पोलीस ठाणे शिवाजीनगर चे पोलीस अंमलदार युवराज गिरी, पोलीस ठाणे एमआयडीसीचे सहायक फौजदार बेल्लाळे, पोलीस अमलदार अर्जुन राजपूत, पोलीस ठाणे रेणापूरचे मुन्ना मदने, महिला पोलीस अमलदार मेघा देवमाने यांनी केली आहे.