अहमदपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
अहमदपूर (गोविंद काळे) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सोमवार दि. १९ रोजी अहमदपूर शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिवभक्तांनी मिरवणुका, मोटार सायकल रॅली, भगवे फेटे व भगव्या ध्वजाणे संपूर्ण शहर भगवे झाले होते. महात्मा फुले विद्यालयाच्यावतीने काढण्यात आलेल्या मिरवणुकीने अहमदपूरकरांचे लक्ष वेधून घेतले. तसेच जय भवानी, जय शिवाजींच्या जयघोषणाने शहर दुमदुमले. या मिरवणुकीत रामलल्ला, हनुमान व बंजारा पथकाने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने सोमवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी व दुग्धाभिषेक करून पुष्पहार अर्पण केला व अभिवादन करण्यात आले. अगदी सकाळपासून चौकात भगवे फेटे परिधान केलेले व मोटार सायकल, कारला शिवरायांची प्रतिमा असलेले भगवे झेंडे लावून शिवभक्त जमा होऊ लागले. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी फुले विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातून भव्य मिरवणूक व विविध पथकाचे देखावे सादर करण्यात आले.
अध्यक्षस्थानी माधवराव पाटील उमरदरेकर होते. उद्घाटन आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव उपस्थित होते. व्यासपीठावर माजी मंत्री विनायकराव पाटील, भाजपा प्रवक्ते गणेश हाके, माजी सभापती शिवानंद हेंगणे, पोलीस निरीक्षक बी.डी. भुसनर, पीएसआय रमेश आलापुरे, मु.अ. काबरा, बी.जी. मुसने आदींची उपस्थिती होती. सेवानिवृत्त मुख्याध्यापक विलास सोळुंके यांच्या हस्ते ध्वजारोहण व शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी आमदार बाबासाहेब पाटील यांनी मिरवणुकीस शुभेच्छा देऊन, उद्घाटन झाल्याचे जाहीर करण्यात आले. यानंतर ढोल ताशाच्या गजरात मिरवणुकीची सुरुवात झाली. यात झांज पथक, लेझीम, विविध देखावे अनेक देवीदेवता व महापुरुष यांची वेशभूषा केलेले पथक, रथातून जिजामाता व घोड्यावर शिवाजी महाराज यांची वेशभूषा धारण करून शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यात प्रामुख्याने शिव गौरव गीत, महाराष्ट्र गीत, जिजाऊ वंदना, शिव पोवाडे, गायनाने अहमदपूर वासियांना मंत्रमुग्ध केले.